कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:12 AM2020-09-16T05:12:57+5:302020-09-16T06:22:57+5:30
मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी संवाद साधला.
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी संवाद साधला.
या संवादात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. एन.रामस्वामी, ठाण्याचे मनपा आयुक्त बिपीन शर्मा, मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकातील लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकाची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे, तसेच कोरोनाविरुद्ध लढताना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असताना कोरोनाची साखळी तोडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून, आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा प्रहार आहे. यातून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यात येईल. सरकारी उपाययोजना, तसेच लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वांनी मिळून यशस्वी केल्यास, इतर राज्यांसाठी ती अनुकरणीय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हा काळ प्रत्येकासाठी ठरणार टर्निंग पॉइंट
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महत्त्वाची आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असून, भविष्यात येणाऱ्या इतर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहीम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.