स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांना राज्यभरात अभिवादन
By admin | Published: July 3, 2017 04:42 AM2017-07-03T04:42:23+5:302017-07-03T04:42:23+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९४वी जयंती रविवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९४वी जयंती रविवारी राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विदर्भात स्मृती जागविल्या
विदर्भातील नागपूरमध्ये ‘लोकमत’ आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.
अमरावतीत लोकमत व संत गाडगेबाबा रक्तपेढी ंअॅण्ड कम्पोनंट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर भंडाऱ्यात लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान झाले. चंद्रपूरात अनेकांनी रक्तदान करून बाबुजींना आदरांजली वाहिली. गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोंदियात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. वर्धा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून बाबुजींना आदरांजली अर्पण केली.
अकोल्यात आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह लोकमत परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. लोकमत व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाणा तसेच वाशिम येथील लोकमत कार्यालयांत श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. वाशिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मराठवाड्यात भावांजली
मराठवाड्यात औरंगाबाद येथे लोकमत व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. लातूर येथे डॉ़भालचंद्र ब्लड बँकेत आयोजित रक्तदान शिबिरात लोकमत परिवारातील सदस्यांसह २५ जणांनी रक्तदान केले़ नांदेड येथे किड्स किंगडम पब्लिक स्कुल येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या प्रारंभी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि बीड येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
खान्देशात उत्स्फूर्त रक्तदान
जळगावात लोकमत व इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर झाले. यात २४ जणांनी रक्तदान केले. तर, अहमदनगर येथे लोकमत आणि आनंदऋषिजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २० जणांनी रक्तदान केले. नाशिकमध्ये लोकमत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली व स्व. जवाहरलालबाबूजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कोकणातही रक्तदान
रत्नागिरीत ‘लोकमत’ परिवार व लायनेस क्लब, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’ कर्मचाऱ्यांसह शहरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केले. पनवेलमध्ये लोकमत आणि रोटरी क्लब आॅफ न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सोलापुरात मान्यवरांकडून स्मरण
सोलापूरमध्ये ‘लोकमत’ आणि गोपाबाई दमाणी ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक व अश्विनी ग्रामीण रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत भवन’मध्ये रक्तदान शिबीर झाले. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. जवाहरलालबाबूजींच्या आठवणी जागवून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.