विद्यार्थ्यांसमवेत सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार

By admin | Published: January 9, 2017 02:34 AM2017-01-09T02:34:07+5:302017-01-09T02:34:07+5:30

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आजपासून दर सोमवारी सेल्फी काढण्याच्या निर्णयावर जिल्ह्यात शिक्षक संघ व शिक्षक समितीने बहिष्कार घातला आहे.

Self-helpers boycott with students | विद्यार्थ्यांसमवेत सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार

विद्यार्थ्यांसमवेत सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार

Next

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आजपासून दर सोमवारी सेल्फी काढण्याच्या निर्णयावर जिल्ह्यात शिक्षक संघ व शिक्षक समितीने बहिष्कार घातला आहे. त्यामुळे अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले जात असून, शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप संघटनांनी
केला आहे.
शाळेतील अनियमित मुले शोधण्यासाठी शासनाने महिन्याच्या दर सोमवारी दहाच्या गटाने शाळेतील सर्व मुलांची वर्गशिक्षकाने सेल्फी काढून फोटो अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी शासनाने स्वतंत्र अ‍ॅपही तयार केले आहे. या निर्णयाची सोमवारपासून (दि. ९) अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. मात्र, शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने शासन विरुद्ध शिक्षक एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.
सेल्फीनंतर शाळेतील मुलांची उपस्थिती दररोज शासनाला कळवायची आहे. यामुळे दैनंदिन अध्यापनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती या संघटनांकडून व्यक्त केली आहे. याआधीच वारंवारच्या आॅनलाइन माहितीबाबत शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आॅनलाइन भरणे, शिक्षक माहिती, वर्गखोल्यांची माहिती, भौतिक सुविधांची माहिती, शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या अनेक माहिती आॅनलाइन भराव्या लागत आहेत. मात्र, यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान नसल्याने शिक्षकांना पदरमोड करावी  लागत आहे.
सर्व शिक्षकांनी अँड्राइड मोबाईल खरेदी करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात येत आहे. ग्रामीण भागात पुरेशी रेंज नसल्याने शिक्षकांना दररोजची माहिती भरण्यासाठी जवळच्या मोठ्या गावात जावे लागत आहे. यामुळे शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याची शिक्षकांची भावना आहे. सेल्फी आणि गुणवत्तेचा कोणताही संबंध नसल्याने सेल्फीचा निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.(प्रतिनिधी)
अडचणी दूर होतील...
आॅनलाइन काही करायचे म्हटले की शिक्षकांना अडचणीचे वाटते. नंतर ते सुरळीत होते. शिक्षकांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातील. संघटनांना विश्वासात घेऊन शासन निर्णयाप्रमाणे हे काम सुरळीत सुरू राहील, असा विश्वास माध्यमिकचे शिक्षणाधिकारी हरूण अत्तार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. तरीही विरोध राहिल्यास शासन आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.


अतिरेक टाळा 
शासनाने मुलांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अशैक्षणिक कामे टाळावीत, आॅनलाइन माहितीचा अतिरेक टाळत शिक्षकांना वर्गात शिकवू द्या. त्वरित सेल्फीचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा सर्वच आॅनलाइन माहितीवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिला आहे.


दोन महिन्यांपूर्वी शिक्षक संघाच्या झालेल्या बैठकीत सर्व मुलांच्या सेल्फीचा निर्णय मागे घेऊन फक्त स्थलांतरित होऊन नव्याने दाखल झालेल्या मुलांच्या सेल्फीचा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निर्णय कायम राहिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमुख संघटनेने सेल्फीवर संपूर्ण बहिष्कार घालत आहे.
- बाळासाहेब मारणे,
अध्यक्ष (पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ)


याला यापूर्वीही समितीने विरोध केला आहे. मात्र शासन निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आम्ही बहिष्कार घालत आहोत. सध्या जिल्ह्यात बोगस विद्यार्थी नाहीत. एक-दोन ठिकाणी जरी असे प्रकार असले तरी त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावणे अयोग्य आहे. शासन सवंग लोकप्रियतेसाठी असे निर्णय घेऊन शिक्षकांना वेठीस धरत आहे.
- नंदकुमार होळकर, अध्यक्ष (पुणे जिल्हा, शिक्षक समिती)
 

Web Title: Self-helpers boycott with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.