आत्मकरुणा
By Admin | Published: July 24, 2016 02:48 AM2016-07-24T02:48:19+5:302016-07-24T02:48:19+5:30
जिच्यात स्वत:प्रती दया आहे, मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि आध्यात्मिक उर्जा आहे, तीच आपल्याला भावसागरातून तारून नेईल. मानवतावादी दृष्टिकोनातून आपण स्वत:कडे
- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
जिच्यात स्वत:प्रती दया आहे, मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि आध्यात्मिक उर्जा आहे, तीच आपल्याला भावसागरातून तारून नेईल. मानवतावादी दृष्टिकोनातून आपण स्वत:कडे माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे आपल्या व दुसऱ्याच्या चुका पोटात घालतो. जगात अपूर्णता आहे व त्या अपूर्णतेचा आपण एक भाग आहोत, हे आपल्याला जाणवते. आयुष्यातील व्यथांबद्दल आपण एक सकारात्मक विधायक आणि संवेदनाशील नजरेतून पाहू लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, स्वकरुणा आपल्याला वेदनेकडे पाहायची वेदनारहित दृष्टिकोन शिकविते.
आपण दुसऱ्यावर टीका करत असताना आपल्या आयुष्यातला बराच काळ विनाकारण फुकट घालवत असतो. त्याहीपेक्षा भयानक म्हणजे, अनेक वेळा आपण स्वत:वरच टीका करत असतो. अशी आत्मनिंदा करीत असताना, आपण स्वत:चेच खच्चीकरण करत असतो. स्वत: केलेल्या काही चुकांचे आपण मोठमोठे डोंगर उभारतो आणि आपल्याच प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. या मानसिकतेचे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
जीवनात यशस्वी व्हायचे म्हणजे, स्वत:ला कठोरपणे घडवायला पाहिजे, असा गैरसमज आपल्या सर्वांच्या मनात असतो. आपण नेमके कुठे चुकतो, याचा परामर्श आपले आईवडील कायम घेत असतात. आपल्यापैकी अनेक जणांचा अनुभव सांगतो की, आपल्याला लहानपणी आपण काय-काय चांगले करतो, हे कुणी सांगायचा प्रयत्न करीत नाही. जे काही चांगले आपण करीत असतो, ते तसेच करायला पाहिजे. त्यात प्रशंसा करण्यासारखे काय असते, असा पवित्रा आपल्या अवतीभवती असलेल्या थोरामोठ्यांचा असतो, पण एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली किंवा आपण कुठे कमी पडलो, तर आपल्याला चांगलेच धारेवर धरले जाते. त्यामुळेच आपणही पुढे तीच फिलॉसॉफी आत्मसात करतो. आपण स्वत:लाच चांगल्या गोष्टीबद्दल गृहित धरतो, पण आपली स्वत:ची छोटीशी चूकही स्वत:चा अमूल्य वेळ व विधायक ऊर्जा वाया घालवतो. त्याच चुकांमध्ये दीर्घकाळ गुंतून राहावयाची सवय आपल्याला जडते.
आपली स्वत:ची प्रशंसा करणे किंवा स्वत:बद्दल दया दाखविण्याच्या भावनेला माणसे सहजासहजी स्वीकारत नाहीत. आपण स्वत:ची स्तुती केली, तर आयुष्यात आपल्याला असफलता मिळेल, अशी लोकांची धारणा आहे. काही वेळा आपण स्वत:बद्दल चांगले बोललो, तर आपण आत्मकेंद्रित झालो आहोत का? आपल्या डोक्यात हवा गेली आहे का? असे लोकांना वाटते. केवळ जगाला वाटते, म्हणून आपण स्वत:चे कौतुक करायचे टाळतो. आयुष्यात कित्येक वेळा इतर कुणाची मदत मिळणे खूप कठीण असते. अत्यंत गरज असतानाही कुणीही आपल्या मदतीला येत नाही, तेव्हा मदत करणारी एकच व्यक्ती तुमच्याजवळ असते, ती म्हणजे तुम्ही स्वत:. दलाई लामा म्हणतात, त्याप्रमाणे तुम्ही स्वत:वर जर प्रेम करू शकत नाही तर तुम्हाला दुसऱ्यावरही प्रेम करता येणार नाही, जर एखाद्या माणसाला स्वत:कडेच दयेने पाहता येत नाही, तेव्हा त्यांच्यात मुळात तो दयाभाव नसावा, दया करुणा व प्रेमभाव या मानवी अस्तित्वाचा भाग आहे. जसा राग, द्वेष, सूड या भावनाही आहेत. आत्मनिंदा करणारी व्यक्ती स्वत:मध्ये राग, द्वेष व सूड यासारख्या भावनांना वाढवित असते. यामुळे त्याना असंतुष्ट बनवितात. मनात सतत असमाधान बाळगणारी व्यक्ती सदैव अतृप्त राहते. साहजिकच, अशी व्यक्ती आतून खवळलेली व बेचैन असते. आपलं काय चुकत हे समजून घेण्यासाठी अंतर्मन शांत व स्वस्थचित्त असेल तरच कळू शकते. स्वत:ची निर्भत्सना करणारी व्यक्ती आयुष्यात काही चांगले विधायक करता येते, यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ असते, पण जेव्हा आत्मकरुणा निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीत प्रथम एक सर्वव्यापी करुणा निर्माण होते. आपल्याला जेव्हा दुसऱ्याबद्दल दया भाव वाटतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्याची व्यथा समजायला लागते. ती व्यथा जर आपल्याला झाली असती, तर आपण किती दु:खी-कष्टी झालो असतो, याची परानुभूती आपल्याला होते. साहजिकच, आपल्या मनात त्या व्यक्तीला तिच्या दु:खातून बाहेर काढायची इच्छा होते. अशाच तऱ्हेने जेव्हा आपल्या मनात स्वत:बद्दल दया निर्माण होते, तेव्हा आपण सकारात्मक स्पंदने निर्माण करतो. जगातील अनेक मने आपल्यासारखी दु:खी असतात, हे ज्याला समजते त्याच्या अंतर्मनात एक करुणेचे वलय निर्माण होते. केवळ ‘मी’ म्हणून चुकता कामा नये. माझ्याकडून अपराध होता कामा नये व मला अपयश मिळता कामा नये, या ‘मी’ च्या चौकटीत लुब्ध होणारे माणसाचे अस्तित्व आपल्या वेदनेची अनुभूती विश्वव्यापी संवेदनातून घेते, तेव्हा तिच्या अविवेकी बुद्धीचा भडका शांत होत जातो. स्वत:ला एक माणूस म्हणून अनुभवयाची जिज्ञासा वाढायला लागते.
विधायक कार्याकडे वळणे आता आपल्याला जमू लागते. आत्मकरुणा म्हणजे आपण आपल्या व्यथेच्या अनुभवांबद्दल संवेदनाशील तर असतोच, पण मनात त्या व्यथेतून बाहेर पडायला हवे, ही आंतरिक उर्मीही असते. याचा अर्थ असा की, आत्मकरुणा जोपासायची असेल तर यातनांचा अनुभव आपण स्वीकारला पाहिजे. हा यातनांचा अनुभव आपण करुणेने पाहतो, तेव्हा त्याबरोबर येणारी असहायता आपल्यातून निघून जाते. जितक्या दयाद्र भावनेने आपण दुसऱ्यांकडे पाहतो, तितक्याच दयार्द्र भावनेने आपण स्वत:कडे पाहतो.
काहींना आत्मकरुणा कदाचित आपल्याला ‘बिचारे’ बनविते असे वाटते. आपण असहाय्य होतो आहे असे वाटते. आपला आपल्या आयुष्यावरचा कंट्रोल गेला आहे असेही वाटते. हे खरे तर आभासी आहे. आत्मनिंदेत आपण अगदी एकटे पडतो, पण आत्मकरुणा आपल्याला विश्वाशी एकरूप करते. दु:ख जेव्हा आपण अंतर्मनात दाबून ठेवतो, तेव्हा ते कधी ना कधी उफाळते, पण आत्मकरुणा या दु:खाची अनुभूती एक मोठ्या दृष्टिकोनातून देते. आपल्या अनेक व्यथा तशा परिस्थितीजन्य असतात. आपल्या कंट्रोलच्या पलीकडच्या असतात. त्या वेदनेतून बाहेर यायचे, म्हणजे त्या वेदनेच्या अनुभवातून विधायकतेकडे जाणे. त्या दु:खाला कवटाळत न बसता स्वत:वरील माणूस म्हणून निरलस प्रेमाने व आत्मकरुणेने त्या दु:खाच्या परे जातो. समर्थ रामदासांची जीवनविषयक तत्त्वप्रणाली आपल्या सर्वांना ज्ञातच आहे.
‘जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधून पाहे!’