सागरी सामर्थ्यात आत्मनिर्भर! ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलात; शत्रूला उत्तर देण्यास सक्षम : संरक्षणमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:58 AM2021-11-22T05:58:13+5:302021-11-22T06:02:39+5:30
नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात भारतीय बनावटीची सर्वात मोठी विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रातील सागरी वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्राला सुरक्षित आणि खुले ठेवणे ही भारतीय नौदलाची प्राथमिक जबाबदारी आहे. काही बेजबाबदार देश संकुचित आणि वर्चस्ववादी धोरणांसाठी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे सोयीस्कर अर्थ लावत आहेत, चुकीच्या व्याख्या मांडत आहेत. सागरी सुव्यवस्थेसाठी असे देश धोकादायक असल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात भारतीय बनावटीची सर्वात मोठी विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षणमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दळणवळण आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कळीच्या आणि महत्त्वाच्या या सागरी क्षेत्राला सुरक्षित आणि खुले ठेवणे, ही भारतीय नौदलाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे राजनाथसिंह यांनी ठामपणे सांगितले.
जागतिकीकरणाच्या या युगात सर्व देश एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे स्थैर्य, आर्थिक विकासासाठी नियमबद्ध मुक्त सागरी संचार, सागरी मार्गांची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे बनले आहे. १९८२ च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेतही सागरी कायद्यांबाबत विस्ताराने चर्चा झाली. एखाद्या देशाचे सागरी क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र आणि योग्य सागरी व्यवस्था या मूल्यांवर भर देण्यात आला; परंतु या मूल्यांचा मनमानी व्याख्या नियमबद्ध सागरी व्यवस्थेत अडथळा निर्माण करतात. काही बेजबाबदार देश आपल्या वर्चस्ववादी धोरणांसाठी या आंतरराष्ट्रीय नियमांचे सोयीस्कर अर्थ लावतात, चुकीच्या व्याख्या मांडतात, असे ते म्हणाले.
शत्रूला चकवा देण्याची क्षमता
- विनाशिका स्टेल्थ प्रणालीवर आधारित. शत्रूच्या रडारला चकवा देण्याच्या क्षमतेची वैशिष्ट्यपूर्ण संरचना.
- अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज
- पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा समावेश
- विनाशिकेवर अत्याधुनिक
टेहळणी रडार
- स्वदेशी बनावटीच्या रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्सचा वापर
आयएनएस विशाखापट्टणम ही देशाच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक आहे. ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी ही अत्याधुनिक विनाशिका सागरी सुरक्षा बळकट करील आणि राष्ट्रहिताचे रक्षण करेल. आगामी काळात भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर जागतिक गरजांच्या पूर्ततेसाठी जहाज बांधणी क्षेत्रात सक्षम होईल.
- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस
राजनाथसिंह यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर दिली.