सेल्फी बेतला जीवावर
By admin | Published: June 13, 2016 05:08 AM2016-06-13T05:08:36+5:302016-06-13T07:06:05+5:30
रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरा किल्ल्याजवळ सेल्फी काढणे एका पर्यटकाच्या जीवावर बेतले.
नांदगाव (अलिबाग) : मुंबईतील बँड स्टँड येथे समुद्राच्या किनारी मोबाईलवर सेल्फी काढण्याच्या नादात तरुणीने जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरा किल्ल्याजवळ सेल्फी काढणे एका पर्यटकाच्या जीवावर बेतले.
शनिवार-रविवार सुटीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील पाच मित्र मुरुड-जंजिरा येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जात असताना रस्त्यात एका उंच ठिकाणी अभिजित पवार (३२) हा जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याच्या नादात दगडावरून पाय घसरून खोल दरीत कोसळला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सर्व मित्र राजपुरी किल्ला पाहण्यासाठी जात असताना, एका दरीजवळील एका उंच ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी अभिजित एका दगडावर उभा राहिला. परंतु पावसामुळे ती जागा निसरडी झाली असल्याचा अंदाज न आल्याने अभिजितचा दगडावरुन पाय घसरून तो दरीत खडकाळ भागात जाऊन पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मित्रांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (वार्ताहर)
>जीवघेणा उत्साह...
राजापुरी किल्ला पाहण्यासाठी जात असताना दरीजवळील उंच ठिकाणावरुन जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याचा मोह अभिजीतला झाला.
सेल्फी काढण्याच्या उत्साहाच्या नादात निसरड्या जागेचा अंदाज न आल्याने पाय घसरुन अभिजीत थेट दरीत कोसळला.