‘सेल्फी’ काढणे बेतले जिवावर !
By admin | Published: January 10, 2016 04:44 AM2016-01-10T04:44:30+5:302016-01-10T04:44:30+5:30
सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणी समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे घडली. या दुर्घटनेत बचावासाठी पुढे सरसावलेल्या तरुणाने दोघींना वाचवले; मात्र तिसऱ्या
मुंबई : सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणी समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे घडली. या दुर्घटनेत बचावासाठी पुढे सरसावलेल्या तरुणाने दोघींना वाचवले; मात्र तिसऱ्या तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत या दोघांचाही थांगपत्ता लागला नाही.
गोवंडी बैंगनवाडी येथील रहिवासी तरन्नुम अन्सारी (१८), अंजुम खान (१७) आणि मुश्तरी खान (१८) या तीन मैत्रिणी शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. ओहोटी असल्याने त्या समुद्रात बऱ्याच आतपर्यंत गेल्या. तेथे सेल्फी काढण्याच्या नादात पाण्याची पातळी वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. अचानक अंजुमचा पाय घसरला आणि तिला पकडण्याच्या नादात तरन्नुम आणि मुश्तरी या तिघीही खाली पडल्या आणि बुडू लागल्या. त्यांना वाचविण्यासाठी रमेश वळुंज (३५) याने समुद्रात उडी घेतली. सुरुवातीला मुश्तरी आणि अंजुमला बाहेर काढून, प्रवाहाच्या ओघात वाहत चाललेल्या तरन्नुमच्या बचावासाठी तो पुढे सरसावला. बचावासाठी तरन्नुमने त्याला घट्ट धरून ठेवल्याने दोघेही भरतीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान, तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सकाळी ११ वाजल्यापासून दोघांनाही शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत एकाचाही थांगपत्ता लागला नाही. (प्रतिनिधी)
अद्याप शोध सुरूच
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून दोघांनाही शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत एकाचाही थांगपत्ता लागला नाही.