शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉइंट’ बंद
By admin | Published: March 2, 2017 05:40 AM2017-03-02T05:40:29+5:302017-03-02T05:40:29+5:30
कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट अखेर बंद करण्यात आला आहे.
मुंबई : कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट अखेर बंद करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील या पहिल्या सेल्फी पॉइंटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सध्या या पॉइंटच्या देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणे कठीण असल्याने, हा सेल्फी पॉइंट बंद केल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. सेल्फी पॉइंट बंद झाल्याने तरुणाईचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क भागात हा सेल्फी पॉइंट सुरू केला होता. मुंबईतील हा पहिलाच अशा प्रकारचा सेल्फी पॉइंट असल्याने तरुणांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगून हा देत सेल्फी पॉइंट बंद केला आहे. या निर्णयामुळे तरुणाईची मात्र, निराशा झाली आहे. (प्रतिनिधी)