दूतावासाच्या नावाखाली केली दारूविक्री
By admin | Published: January 31, 2016 02:12 AM2016-01-31T02:12:28+5:302016-01-31T02:12:28+5:30
परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत, दारूची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला.
मुंबई : परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत, दारूची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख दोन लाख, महागड्या मद्याच्या ९४ बाटल्यांसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कविभागाचे आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.
परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्क माफ असणाऱ्या मद्याची खरेदी करण्याची सवलत दिली जाते. याचाच फायदा घेत, एक टोळी सवलतीतून घेतलेल्या महागड्या दारूची बाजारात विक्री करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी पथकास समजली. भरारी पथकाचे संचालक डॉ. बी.जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पाचजणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून ब्लॅकलेबल, ग्लेन फिडीश, डॅलमोर अशा महागड्या मद्याच्या ९४ बाटल्या, २ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. वरळीतील भीमा बिल्डिंगच्या आवारात, वाळकेश्वर येथील अफगाण दूतावासासमोर, तसेच पांडुरंग बुधकर मार्गावर या कारवाया करण्यात आल्याचे सिंघल यांनी सांगितले. या प्रकरणी नारायण कांजी बाभणीया, विजय दूधनाथ यादव, नारायण जिवा पटेल, नितीन तुकाराम गुरव आणि बच्चू नाथा चंदात - पटेल ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निरीक्षक एम. एस. बिलोलीकर, सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक प्रकाश काळे, एस. जी. देवरे, दत्ता शिंदे, सय्यद आदींनी या कारवाईत सहभाग
घेतला. (विशेष प्रतिनिधी)
सापडले धागेदोरे
अर्जेंटिनाच्या दूतावासासाठी उत्पादन शुल्कात सवलत असलेली दारूखरेदी करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला होता. त्यांनी अर्जेंटिना दूतावासाचे पत्रही सादर केले होते, परंतु हे पत्र दूतावासाने दिले नसल्याचे आढळून आले.
दूतावासातील काही कर्मचारी सवलतीची दारूखरेदी करून महागड्या दरांत त्याची विक्री करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली.