धोकादायक फटाका विक्री
By Admin | Published: October 31, 2016 01:24 AM2016-10-31T01:24:58+5:302016-10-31T01:24:58+5:30
बाजारपेठेसह गल्लीबोळात अग्निशामक विभाग व पोलिसांचा परवाना न घेता अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत.
पिंपरी : शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेसह गल्लीबोळात अग्निशामक विभाग व पोलिसांचा परवाना न घेता अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत. नियम, अटींचे पालन न करता अत्यंत धोकादायक पद्धतीने उभारलेले फटाका स्टॉल दुर्घटनेस निमंत्रण देऊ शकतात.
औरंगाबाद येथील फटाका दुकांची भीषण आगा आणि भायखळा-मुंबईत येथील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी फटाका विक्रेत्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनापरवाना आणि कोणतीही दक्षता न घेतलेले फटाका स्टॉल शहराच्या विविध भागांत आहेत. पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची नुकतीच बैठक झाली.
या बैठकीत विनापरवाना फटाका विक्री दुकाने थाटणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे ठरले. महापालिका आणि पोलीस यांच्यामार्फत ही संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाला. अशा फटाका विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असली, तरी दिवाळीच्या काही दिवसांच्या कालावधीत सर्वच ठिकाणी पाहणी करणे पोलिसांना शक्य नाही. अनेक ठिकाणचे असे धोकादायक फटाका स्टॉल त्यांच्या नजरेतून सुटू शकतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
वर्दळीच्या ठिकाणी लोकवस्तीत फटाका स्टॉलपिंपरी कॅम्प ही शहराची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. नेहमीच वर्दळ असलेल्या बाजारपेठेच्या परिसरात अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. आकुर्डी खंडोबा माळ आणि एचएचे मोकळे मैदान या ठिकाणी पूर्वी फटाका विक्रीच्या स्टॉलच्या रांगा असत.मोकळ्या जागेत अनेक फटाका दुकाने हे चित्र आता दिसून येत नाही, परंतु लोकवस्तीच्या भागात स्टॉल दिसून येत आहेत.
फटाका विक्री दुकानासाठी ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची पाहणी केली जाते. शक्यतो लोकवस्तीच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर अशी दुकाने थाटण्यास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली जाते. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकाम असलेले दुकान नसेल, तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे.