दूधवाढीच्या औषधांची विक्री; दुकानांवर एफडीएचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:50 AM2018-09-03T05:50:46+5:302018-09-03T05:51:46+5:30
गाई-म्हशींचे दूध वाढावे म्हणून अवैधपणे वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसिन औषधाची विक्री करणा-या मेडिकल दुकानांविरोधात रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मोहीम उघडली.
मुंबई : गाई-म्हशींचे दूध वाढावे म्हणून अवैधपणे वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसिन औषधाची विक्री करणा-या मेडिकल दुकानांविरोधात रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मोहीम उघडली. मुंबईसह राज्यात आॅक्सिटोसिनची अवैध विक्री करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
एफडीएने रविवारी मुंबई आणि ठाण्यात १७ ठिकाणी छापे टाकले. सायन, परळ, अंधेरी, दहिसर, कांदिवली, घाटकोपर येथे तोतया ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय आॅक्सिटोसिनची अवैध विक्री पकडण्यात आली. दुकानांचे बिलबुकही तपासण्यात आले.
प्रसुतीच्या काळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी आॅक्सिटोसिनचा वापर केला जातो. स्तनपानासाठीही हे औषध महत्त्वाचे मानले जाते. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि त्याचा प्रमाणित डोस घेणे आवश्यक असते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराने कर्करोगाची भीती असते. आॅक्सिटोसिनचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शरीरविक्रीच्या रॅकेटमधील दलाल, भाजी व फळांची वेगाने वाढ व्हावी यासाठीही आॅक्सिटोसिनचा वापर वाढत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या.
आॅक्सिटोसिनच्या बेकायदेशीर विक्रीविषयी राज्यातील मेडिकल दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियम मोडणाºयांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
- अमृत निखाडे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग