‘समृद्धी जीवन’ची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:06 AM2017-08-02T01:06:58+5:302017-08-02T01:07:13+5:30
‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मुंबई : ‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
‘समृद्धी जीवन समूह’ आणि त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली, या संदर्भात सदस्य सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मेधा कुलकर्णी, किशोर पाटील, डॉ. मुंदडा, आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘संबंधित प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपत्ती ताब्यात घेतली आहे. एमपीआयडी कायद्यानुसार विक्री करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सीआयडी न्यायालयीन आदेशानुसार प्रस्ताव राज्य शासनास देणार आहे. त्यास शासन तत्काळ मान्यता देऊन प्रापर्टी अटॅच केलेल्या आहेत. त्यांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यासंदर्भातील कारवाई केली जाईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘कंपन्यांनी ठेवी घेण्यासंदर्भातील केंद्र सरकार, आरबीआय आणि सेबी यांनी कडक नियम बनविले आहेत.’