शिवसेना पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत

By admin | Published: August 26, 2015 12:42 AM2015-08-26T00:42:51+5:302015-08-26T00:42:51+5:30

पतंगरावांचा गौप्यस्फोट : काँग्रेसतर्फे कोल्हापुरात पर्दाफाश आंदोलन

Sena is ready to withdraw support | शिवसेना पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत

शिवसेना पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत

Next

कोल्हापूर : शिवसेना कोणत्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता भाजपला पाठिंबा देणार नाही, असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील भाजप सरकारचे काही खरे नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी केला.
केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ जिल्हा व शहर काँग्रेसने पर्दाफाश आंदोलन केले. याप्रसंगी काँग्रेस कार्यालयातील मेळाव्यात कदम बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण प्रमुख उपस्थित होते. आमदार कदम म्हणाले, केंद्र, राज्यातील सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. खोटी आश्वासने, स्वप्ने दाखवून निवडून आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड होत आहे. दुष्काळाचे सावट गडद झाले आहे तरीही शासन काहीही करायला तयार नाही. त्यामुळे यापुढे काँग्रेसने एकसंघ राहून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा.
पी. एन. पाटील म्हणाले, राज्य टोलमुक्त करू, अच्छे दिन आणू, महागाई कमी करू, अशी आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीही केलेले नाही. शेतकऱ्यांसमोर प्रचंड अडचणी आहेत तरीही सरकार कर्जमाफी करायला तयार नाही.
माजी मंत्री पाटील म्हणाले, शासनाने जनतेची निराशा केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या विरोधात घोषणा केलेल्या पर्दाफाश आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात झाली. महापौर वैशाली डकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सुरेश कुराडे, एस. के. माळी, संध्या घोटणे, सरला पाटील यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)


काँग्रेसमधील गद्दारांबद्दल बोला...
आमदार कदम यांचे भाषण संपल्यानंतर उपस्थित एका कार्यकर्त्याने ‘साहेब काँग्रेसमधील गद्दारांबद्दल बोला’, असे ओरडून सांगितले. त्या कार्यकर्त्याकडे सतेज पाटील यांनी डोळे वटारून पाहून तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला. त्यामुळे कार्यकर्ता शांत झाला.
महादेवरावांची दांडी...
अमल महाडिक भाजपचे आमदार असल्यामुळे भाजपच्या विरोधातील पर्दाफाश आंदोलनात आमदार महादेवराव महाडिक सहभागी होणार की नाही, याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, त्यांनी दांडी मारली.

‘मोदी सरकार चले जाव...’
दुपारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यालयाच्या कक्षापर्यंत घुसून त्यांनी निदर्शने केली. ‘मोदी सरकार चले जाव’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Sena is ready to withdraw support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.