मोदींच्या कार्यक्रमावर सेनेचा बहिष्कार
By admin | Published: October 12, 2015 05:14 AM2015-10-12T05:14:20+5:302015-10-12T05:42:19+5:30
इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात झालेली टाळाटाळ व संपूर्ण शासकीय सोहळा हायजॅक करण्याचा मुंबई भाजपाकडून झालेला प्रयत्न,
मुंबई : इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात झालेली टाळाटाळ व संपूर्ण शासकीय सोहळा हायजॅक करण्याचा मुंबई भाजपाकडून झालेला प्रयत्न, यामुळे शिवसेना कमालीची नाराज झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा अलिखित व्हीप शिवसेनेने बजावल्याने शिवसेनेचा एकही नेता कार्यक्रमाला हजर राहिला नाही.
इंदू मिलच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, राजेंद्र गवई असे दलित चळवळीतील सर्व नेते मोदींसमवेत हजर राहिले. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले गेले नाही.
एमएमआरडीएच्या मैदानावरील जाहीर कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे शनिवारी उद्धव यांना भेटले. सोहळ्याच्या आदल्या दिवशी निमंत्रण देण्याबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून, त्यांना आदल्या दिवशी निमंत्रण देणे ही चूक असल्याचे ते म्हणाले. याबाबत मेहता यांना विचारले असता, आपण निमंत्रण दिले, तेव्हाच उद्धव यांनी आपण येणार नाही हे स्पष्ट केले, असे सांगितले. उद्धव ठाकरे हे मंत्री, खासदार, आमदार नसल्याने त्यांना व्यासपीठावर बसवण्यात राजशिष्टाचारानुसार अडचण असून, त्यामुळेच त्यांनी येण्याचे टाळले, असे अन्य एका मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. (विशेष प्रतिनिधी)