दुरावा मिटला, शिवसेना - भाजपाचा नव्याने संसार ?
By admin | Published: December 2, 2014 02:58 PM2014-12-02T14:58:48+5:302014-12-02T15:03:16+5:30
शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे वृत्त असून आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल अशी चिन्हे आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे वृत्त असून आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल अशी चिन्हे आहेत. भाजपाने शिवसेनेला १२ मंत्रिपद द्यायची तयारी दर्शवली असून उद्योग, पर्यावरण, परिवहन, उत्पादन शुल्क ही खाती सेनेला मिळतील असे खात्रीलायक वृत्त आहे.
विधानसभेत आवाजी मतदानाद्वारे विश्वासदर्शक ठराव मंजूर करून भाजपाने चतुराईने सरकार तारले आहे. यासाठी राष्ट्रवादीनेही छुपा पाठिंबा दिला. मात्र शरद पवारांनी मध्यवधी निवडणुकांचे संकेत देताच भाजपानेही शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली. गेल्या तीन दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून अखेर या चर्चेत तोडगा निघाल्याचे समजते. शनिवारी शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईत आलेले भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर 'उद्याच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेला पाच कॅबिनेट मंत्रिपद ?' अशा स्वरुपाचे ट्विट करत शिवसेनेसोबत मनोमिलनाचे संकेत दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेनेसोबत ८० टक्के चर्चा पूर्ण झाली असून लवकरच तोडगा निघेल असे म्हटले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही भाजपा नेत्यांविरोधात जाहीर टीका करु नसा असा आदेश आमदार व पक्ष नेत्यांना पाठवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेत सहभागी झाल्यावर शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, आरोग्य, रस्ते विकास, परिवहन आणि उत्पादन शुल्क ही खाती दिली जातील. तर अन्य महत्त्वाच्या खात्यांमधील राज्यमंत्रीपद सेनेला देण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे. उद्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यामध्ये शिवसेना नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असे दिसते.