बंडखोर आमदारांसाठी सेनेचे दार आजही खुले - अरविंद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:50 AM2022-08-14T06:50:10+5:302022-08-14T06:50:35+5:30
Arvind Sawant : भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.
मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडाला साथ देत त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेतील काही आमदारांसाठी शिवसेनेचे परतीचे दोर कायम आहेत. मात्र, काही लोकांनी स्वतःहून हे परतीचे दोर कापले असल्याने त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका शिवसनेचे नेते अरविंद सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
आमचे दरवाजे आजही खुले आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही विचार करावा, असे आवाहन आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असताना करत आहेत. याबाबत विचारले असता, सावंत म्हणाले की, परतीचे दोर कापले आहेत, असे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेतील कुणीही म्हटलेले नाही. मात्र, कुठल्या गद्दारांना क्षमा करावी, हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. कारण काहींनी स्वतःहून परतीचे दोर कापले आहेत.
ईडीच्या कारवाईला भिऊन हे लोक पळालेले आहेत. यांचा हिंदुत्वाशी, भगव्याशी काहीही संबंध नाही. हे बंडखोर गद्दारच आहेत.
भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.
शिरसाटांचे ट्विट ब्लॅकमेल करण्यासाठी
शिंदे गटाबरोबर गेलेले, मात्र मंत्रिपद न मिळालेले आमदार संजय शिरसाट नाराज आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आपल्या ट्विटरच्या डीपीला ठेवला होता. तसेच उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओही ट्विट केला होता. हे तांत्रिक चुकीमुळे झाल्याचा खुलासा करत शिरसाट यांनी हे ट्विट नंतर डिलिट केले. मात्र, व्हिडिओसकट ट्विट तांत्रिक चुकीमुळे कसे होऊ शकते, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.
हे सगळे ब्लॅकमेलर आहेत. यांची निष्ठा ना हिंदुत्वाशी आहे, ना विचारांशी आहे, ना शिवसेनेशी, ना फुटिरतावादी गटाशी, यांची निष्ठा खुर्चीशी आहे. हे जनतेची सुद्धा कशी फसवणूक करत आहेत, हे जनतेलाही कळेल, अशा शब्दात सावंत यांनी शिरसाटांचा समाचार घेतला.