हफ्तेखोरीसाठीच सेनेला फेरीवाल्यांचा पुळका, मनसेची टीका : पथनाट्याद्वारे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 03:16 AM2017-11-14T03:16:00+5:302017-11-14T03:16:31+5:30
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली होती.
मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. इतके दिवस मौन बाळगलेल्या शिवसेनेने आता अचानक अधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. यावर केवळ हफ्तेखोरीसाठी अधिकृत आणि अनधिकृतचा घोळ घातला जात आहे, अशी टीका मनसेने केली
आहे.
फेरीवाल्यांवरून सुरू असलेल्या वादात उडी घेत शिवसेनेने अधिकृत फेरीवाल्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका संजय राऊत यांनी सोमवारी मांडली. ज्यांच्याकडे परवाने आहेत, ते अधिकृत आहेत. त्यांना व्यवसाय करू द्यावा. त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांच्याविरोधात भूमिका घेणे कोणालाही परवडणारे नाही, असे राऊत म्हणाले.
शिवसेना फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका घेताना मनसेने त्यावर हरकत घेतली आहे. अधिकृत फेरीवाला आणि अनधिकृत फेरीवाला हा घोळ शिवसेनेने घातला आहे. या गोंधळामागे हफ्तेखोरीचे राजकारण असल्याचा दावा मनसेने केला आहे. अधिकृत, अनधिकृत फेरीवाला प्रकरण दहा-बारा वर्षांपासून लटकवून ठेवण्यात आले आहे. सर्वेक्षण झाल्यावरही त्याबाबत अंतिम निर्णय घेतला नाही. हफ्तेखोरीमुळेच शिवसेनेला आता फेरीवाल्यांचा पुळका आला आहे, अशी टीका मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केली. शिवसेनेने अधिकृत फेरीवाल्यांची बाजू मांडली. त्यावर सोमवारी मनसेच्या पदाधिकाºयांनी दादर परिसरात पथनाट्य सादर करत शिवसेनेचा निषेध केला.
ठाण्यातील सभेवर ठाम-
फेरीवाला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभेची घेण्याची घोषणा केली. या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी चालविली असली, तरी आता सभेच्या ठिकाणावरून वाद सुरू झाला आहे. ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर किंवा तलावपाळी मार्गावर मनसेला सभा घ्यायची आहे. मात्र, रस्त्यावर सभा घेता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने वाद सुरू झाला आहे.
आमच्या लढ्यामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत, माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे, आम्हाला कल्पना आहे, हे यंत्रणेचे दृष्टचक्र भेदताना हा लढा दडपण्याचा प्रयत्न होणार. ही लोकशाहीची पायमल्ली नाही का? असा सवाल मनसैनिकांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी विरोध केला असला, तरी ‘आम्ही सभा घेणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.