राज्यमंत्रिपदांवरच सेनेची बोळवण!
By Admin | Published: July 8, 2016 05:09 AM2016-07-08T05:09:16+5:302016-07-08T05:09:16+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही केवळ दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद
- दहा मंत्र्यांचा आज शपथविधी
- फुंडकर, निलंगेकर, देशमुख,जानकर, खोत आदींचा समावेश
- शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही केवळ दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद वाढवून मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून केली, पण मंत्रिपदाबाबत आधीच सूत्र ठरलेले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्यास नकार दिला. सदाभाऊ खोत व महादेव जानकर हे मित्रपक्षाचे दोघेही राज्यमंत्री असतील.
मुख्यमंत्र्यांकडून नकार येताच नरमाईची भूमिका घेत ‘शिवसेना उद्याच्या विस्तारात सहभागी होईल आणि आमचे दोन नेते मंत्री होतील’, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील २१ महिन्यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यात भाजपाचे सहा, शिवसेनेचे दोन आणि मित्रपक्षांचे दोन, असे दहा मंत्री असतील. संभाव्य मंत्र्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर, सोलापूर ग्रामीणचे आमदार सुभाष देशमुख, निलंग्याचे (जि. लातूर) संभाजी पाटील निलंगेकर, सिंदखेडाचे (जि. धुळे) जयकुमार रावल, यवतमाळचे मदन येरावार आणि डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण या भाजपा विधानसभा सदस्यांचा समावेश असेल. शिवसेनेकडून जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील व जालनाचे आमदार अर्जून खोतकर यांना संधी मिळणार आहे. तर मित्रपक्षांपैकी राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना स्थान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून शेवटी भाऊसाहेब फुंडकर यांचा नंबर लागला आहे. तेथे सातत्याने विधानसभेत निवडून येत असलेले मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आणि जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांची संधी हुकली आहे. सुभाष देशमुख यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्याला दुसरे मंत्रीपद मिळत आहे. याच जिल्ह्यातील विजय देशमुख हे सध्या राज्यमंत्री आहेत.
आतापर्यंत मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले संभाजी पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत. त्यांनी सर्वप्रथम आजोबांचा पराभव करीत विधानसभा गाठली होती. जयकुमार रावल हे उद्योजक कुटुंबातील असून तिसऱ्यांदा भाजपाचे आमदार आहेत. गुलाबराव पाटील आणि अर्जून खोतकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. खोतकर हे १९९५ मधील युती शासनामध्ये राज्यमंत्री होते. पाटील यांची ओळख शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी आहे. (विशेष प्रतिनिधी)
कोणालाही डच्चू नाही
मंत्रिमंडळातून कोणालाही डच्चू दिला जाणार नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अमूक मंत्र्यांना वगळणार या चर्चेला त्यामुळे पूर्णविराम लागला आहे.
संपूर्ण शिक्षण विभागाचे मंत्री असलेले विनोद तावडे यांच्याकडील उच्च व तंत्रशिक्षण किंवा शालेय शिक्षण यापैकी एखादा विभाग काढून घेतला जाणार असेही बोलले जात होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पूर्वीसारखेच संपूर्ण खाते असेल.
विस्तारात महिला नाहीतच
मंत्रिमंडळात सध्या पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला आहेत. विस्तारातदेखील महिलेचा समावेश नसल्याने मंत्रिमंडळातील महिलांची संख्या दोनच राहणार आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबईला संधी दिली जाईल, असा होरा होता. पण तसे झाले नाही.
शिवसेनेकडे एक गृह राज्यमंत्रीपद
गृह राज्यमंत्रीपद सध्या रणजीत पाटील (शहरे) आणि राम शिंदे (ग्रामीण) या भाजपा नेत्यांकडे आहेत. त्यापैकी एक गृह राज्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यात येणार असून त्यातही ग्रामीणचे गृह राज्यमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. शिवाय, सर्व राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात येईल. राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल.
विभागनिहाय वाटप
भाजपाकडून पश्चिम विदर्भ- २, उत्तर महाराष्ट्र - १, मराठवाडा - १, कोकण १ आणि पश्चिम महाराष्ट्र १ असे नवीन मंत्री घेतले जात आहेत.
शिवसेनेकडून उत्तर महाराष्ट्राला १ आणि मराठवाड्याला १ असे प्रतिनिधित्व नव्याने मिळेल. जानकर आणि खोत हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.
चार जागा रिक्त राहणार सध्या राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 29 एकूण आता ३९ मंत्री होतील. अर्थ भाजपाच्या वाट्याला असलेल्या चार जागा रिक्त राहणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल
खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महसूल खाते पाटील यांच्याकडे जाऊ शकते. त्यांच्याकडील बांधकाम खाते कायम राहील.
सभापती कोण, निंबाळकर की टकले?
नवे सभापती निवडण्यासाठी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन शुक्रवारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर हे विद्यमान सभापती आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन सभापतीपदाच्या नावाबाबत चर्चा झाली.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सभापती व्हावे, असे त्यांना सुचविले. पण सूत्रांनी सांगितले की तटकरे यांनी त्यास नकार दिला. पक्ष संघटनेतच काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
शेवटी सभापतीपदाचे नाव निश्चित करण्याचे सर्वाधिकार शरद पवार यांना एकमताने देण्यात आले. पवार उद्या सकाळी १० वाजता नाव जाहीर करतील, असे तटकरे यांनी लोकमतला सांगितले. निंबाळकर किंवा हेमंत टकले यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होईल, असे मानले जाते. विधान परिषदेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे बहुमत आहे.
शपथ घेणार...
भाजपा
भाऊसाहेब फुंडकर
सुभाष देशमुख
जयकुमार रावल
संभाजी पाटील निलंगेकर
रवींद्र चव्हाण
मदन येरावार
मित्रपक्ष
महादेव जानकर
सदाभाऊ खोत
शिवसेना
गुलाबराव पाटील
अर्जुन खोतकर
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री