सिनेट निवडणुकीचे काम ‘आस्ते कदम’, आॅनलाइन निकालाच्या गोंधळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:15 AM2017-10-23T02:15:07+5:302017-10-23T02:15:16+5:30
मुंबई विद्यापीठावर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम अन्य कामावर होताना दिसत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सिनेट निवडणुकांचे काम पूर्ण करण्याची मुदत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठावर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम अन्य कामावर होताना दिसत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सिनेट निवडणुकांचे काम पूर्ण करण्याची मुदत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. पण, अजूनही मतदारांची अधिकृत यादी विद्यापीठाने जाहीर केली नसल्यामुळे सिनेट निवडणुकांचे काम आस्ते कदम सुरू असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या सिनेटची निवडणूक लागल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. राज्य सरकारतर्फे नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्याने सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठात लगबग सुरू झाली आहे. पण विद्यापीठ प्रशासन सध्या निकालांमध्ये गुंतलेले आहे. यामध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठ कंबर कसून काम करीत आहे. सिनेट निवडणुकांसाठी अधिकृत मतदार यादी जाहीर न झाल्याने आता विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. या दिरंगाईमुळे आता सिनेट निवडणुका वेळेवर पूर्ण होणार की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण झाली, यात नोंदणीधारकांचा आकडा ६० हजारांच्या वर गेला आहे. यापुढे अजून कोणतीही हालचाल झालेली नाही. निवडणुकांचे काम पाहण्यासाठी अधिकाºयांची नोंद करावी. निवडणुकांची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार करण्यासाठी आता योग्य अधिकाºयांची नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.