सेनेतर्फे महाडेश्वर तर कॉँग्रेसतर्फे लोकरे
By admin | Published: March 5, 2017 02:21 AM2017-03-05T02:21:24+5:302017-03-05T02:21:24+5:30
मुंबईत महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता ताणलेली असताना पक्षांतर्गत अनेक दावेदारांचा विचार करून शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर
मुंबई : मुंबईत महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता ताणलेली असताना पक्षांतर्गत अनेक दावेदारांचा विचार करून शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांचे नाव जाहीर झाले आहे. या दोघांनी अर्ज भरल्यानंतर तासाभरातच काँग्रेसतर्फे विठ्ठल लोकरे यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. भाजपाने अखेरच्या क्षणी महापौरपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उभय पक्षांनी महापौरपदावर दावा केला. त्यानुसार ११४ चा जादुई आकडा मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरू झाली. शिवसेनेने चार अपक्षांचे समर्थन मिळवले, तर भाजपानेही गेल्या दोन दिवसांत अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी आणि मुमताज शेख या अपक्षांचे मत आपल्याकडे वळवले. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असे संकेत होते. भाजपाकडून अन्य राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची मते फोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे चित्र होते. शिवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असल्याने महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात आले. महापौरपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौरपदाचे उमेदवार म्हणून विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांची नावे जाहीर झाली. त्यानुसार पावणेतीनच्या सुमारास त्यांनी महापालिकेच्या चिटणीसांकडे आपला उमेदवारी अर्ज दिला. तासाभरात काँग्रेसच्या वतीने विठ्ठल लोकरे यांनी महापौरपदासाठी तर विन्फ्रेड डिसोजा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. त्यामुळे भाजपातून कोण अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती, मात्र शेवटच्या क्षणी भाजपा महापौरपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने मुंबई महापालिकेत महापौर शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)
महाडेश्वर यांचा परिचय
महाडेश्वर हे वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक ८७ येथून निवडून आले आहेत. नगरसेवक म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी नगरसेवक असताना महाडेश्वर पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्य होते. शिक्षण समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. राजे संभाजी विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत. बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी त्यांचे नगरसेवकपद २००७ मध्ये रद्द झाले होते. महाडेश्वर हे शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या जवळचे मानले जातात. महापौरपदाच्या शर्यतीत मंगेश सातामकर, आशिष चेंबूरकर यांची नावे चर्चेत असताना महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.