राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस सेनेचे मंत्री निमूटपणे उपस्थित, दसरा मेळाव्याकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:02 AM2017-09-20T07:02:23+5:302017-09-20T07:02:31+5:30
‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.
यदु जोशी
मुंबई : ‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.
‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी,‘सरकारमध्ये त्यांची कामेच होत नाहीत. भाजपाचे मंत्री त्यांची अडवणूक करतात’ असे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मंत्री आज मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहतील की नाही याची चर्चा होती. १ तास २० मिनिटे मंत्रिमंडळ बैठक झाली. शिवसेनेच्या आमदारांची विकास कामे होत नसल्याची तक्रार सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठकीत केली नाही. कुठल्याच निर्णयाला विरोध केला नाही.
‘कामेच होत नसतील तर सरकारमधून बाहेर पडा, विरोधी पक्षात राहून काम करू’ असा आग्रह बहुतेक आमदारांनी मातोश्रीवरील सोमवारच्या बैठकीत धरला होता. सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले नाहीत. शिवसेनेचे मंत्री त्यांच्या परवानगीनेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले. याचा अर्थ केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करतानाच सरकारमध्ये कायम राहण्याकडेच सेना नेतृत्वाचा कल आहे, असे म्हटले जाते. शिवसेना मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असता तर फडणवीस यांना तो इशारा ठरला असता पण मंत्री हजर राहिल्याने भाजपाशी समन्वयाची भूमिका राहील, असे संकेत शिवसेनेने दिले.
फुटीची भीती!
फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तर सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. एक तृतीयांश आमदार भाजपाच्या गळाला लागले तर त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळेल आणि सरकारच्या स्थैर्यावरही विपरित परिणाम होणार नाही. मातोश्रीवरील कालच्या बैठकीत सेनेच्या नेत्यांच्या (मनोहर जोशी, खा.संजय राऊत) भाषणांमध्येही पक्ष सोडून जाणारे संपतात हा अनुभव आहे, असा इशारा देत दुसरीकडे त्यांना चुचकारले होते.
>शिवसेनेतील अस्वस्थेतच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३० सप्टेंबरला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात काय बोलतात याची उत्सुकता असेल. भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा करणार का, ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.