रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी

By admin | Published: July 11, 2017 04:06 AM2017-07-11T04:06:37+5:302017-07-11T04:06:37+5:30

आॅटोरिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा करून शिवसेनेने सोमवारी रेल्वे स्थानकावर गांधीगिरी केली.

Senchi Gandhigiri to discipline the autorickshaw drivers | रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी

रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आॅटोरिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा करून शिवसेनेने सोमवारी रेल्वे स्थानकावर गांधीगिरी केली. ठाण्यात आॅटोरिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. विनयभंग आणि तरुणींना मारहाण करण्यापर्यंत रिक्षाचालकांनी मजल गाठली. अलीकडच्या काळात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमुळे रिक्षाचालकांबद्दल ठाणेकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावरील आॅटो स्टॅण्डवर आंदोलन केले. महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह पक्षाचे इतर नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले.
प्रवाशांना रिक्षा करून देण्यास नगरसेवकांनी या वेळी मदत केली. रिक्षाचालकांना गुलाबाची फुले देऊन, नियमांचे पालन करण्याचे आवाहन या वेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना केले. हे आंदोलन गत आठ दिवसांपासून सुरू असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. परिवहन समिती सदस्य प्रकाश पायरे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे. आणखी महिनाभर सेनेचा हा कार्यक्रम सुरू राहील, असे महापौरांनी या वेळी सांगितले. आॅटोरिक्षामध्ये चालकाचा संपूर्ण तपशील लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
>वेळ चुकली अन जागाही...
शिवसेनेने गांधीगिरी आंदोलन करण्यासाठी ठरवलेली वेळ तर चुकलीच, शिवाय जागाही चुकली. सेनेच्या या आंदोलनामुळे प्रवाशांची सोय कमी आणि गैरसोयच जास्त झाली.
पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुलाबाची फुले घेऊन उभे राहिल्याने अगोदरच अरुंद जागेत उभारलेल्या आॅटोस्टॅण्डवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. एरव्ही, रिक्षा स्टॅण्डवर रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना साधारणत: ७ ते ८ मिनिटांत रिक्षा मिळते.
सेनेच्या आंदोलनामुळे मात्र १५ ते २० मिनिटे थांबावे लागल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. ऐन सायंकाळी कामावरून आलेल्या ठाणेकरांना घरी पोहोचण्याची गडबड असताना सेनेने आंदोलन केले. वेळ दुसरी निवडली असती, तर आणखी बरे झाले असते, असे मतही काही प्रवाशांनी या वेळी व्यक्त केले.
...तर सेना स्टाइल आंदोलन : सेनेने केलेली गांधीगिरी हा पक्षाच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या गांधीगिरीतून आॅटोरिक्षाचालकांमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. मात्र, चालकांमध्ये सुधारणा झाली नाही, तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी सेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा महापौरांनी या वेळी दिला.

Web Title: Senchi Gandhigiri to discipline the autorickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.