शिक्षणमंत्री तावडेंना घरी पाठवा
By admin | Published: March 11, 2016 04:24 AM2016-03-11T04:24:25+5:302016-03-11T04:24:25+5:30
मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा
मुंबई : मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा, असा हल्लाबोल विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केला. यावरून झालेल्या गदारोळात कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तावडे यांनी मंत्र्यांसाठीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करीत, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली. विखे, चव्हाण, तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. तावडे यांच्यावर आरोप करण्यासाठी नियम ३५ नुसार आधी नोटीस द्यायला हवी होती, असे सांगत, अध्यक्ष बागडे यांनी विखे पाटील यांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य वेलमध्ये येऊनतावडेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. यावेळी तावडे सभागृहात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण या बाबत आजच निवेदन करू असे सांगितले. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. मी आजच उत्तर देईन पण आघाडी सरकारच्या काळात किती मंत्री कुठे संचालक होते हेही पहावे लागेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाने विरोधक अधिकच संतप्त झाले. हे सुडाचे राजकारण असून हा धमकावण्याचा प्रकार आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला.
विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. चवथ्यांदा ते सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)
————————————————
गोंधळलेले विरोधक
मुद्दा सोडतात तेव्हा...
काँग्रेस-राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव, विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची कमी पडलेली आक्रमकता याचा अनुभव आज सभागृहात आला. काँग्रेसचे सदस्य दुष्काळाकडे लक्ष वेधणारे फलक घेऊन सभागृहात आले पण विखे यांनी मागणी लावून धरली ती तावडेंच्या राजीनाम्याची! त्यामुळे विरोधकांना नेमके काय हवे आहे, हे समजेना. ‘विरोधक गोंधळलेले आहेत. ते कधी दुष्काळ धरतात, तर कधी मंत्र्यांना पकडतात. जरा पाचदहा मिनिटे विचार करून मग पुन्हा सभागृहा या’ असा टोला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना लगावला.