शैक्षणिक धोरणासाठी सूचना पाठवा
By admin | Published: November 18, 2015 03:17 AM2015-11-18T03:17:17+5:302015-11-18T03:17:17+5:30
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी ६ तास की ८ तास यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा अनावश्यक असून, काही आमदार मतांच्या राजकारणासाठी ही चर्चा
मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी ६ तास की ८ तास यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा अनावश्यक असून, काही आमदार मतांच्या राजकारणासाठी ही चर्चा घडवून आणत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष गुणवत्तेचा विचार करण्यासाठी शिक्षण विभागाने या धोरणाचा प्रस्तावित मसुदा https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड केला असून, यामध्ये सर्व संबंधितांनी आपल्या सूचना, अभिप्राय सादर करावेत आणि त्यानंतरच हे धोरण अंतिम होईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारतर्फे सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रथमच गावपातळीवर ३२ हजार गावांत जाऊन या शैक्षणिक धोरणावर चर्चा घडवून आणली. १४ शैक्षणिक प्रश्नांवर आधारित विविध प्रश्नांवर गाव, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर या धोरणाबाबत सर्वंकष चर्चा केली. त्या स्तरावरील सर्व संबंधितांची मते जाणून घेतली, त्यातून काही सूचनाही प्राप्त झाल्या. या चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेल्या शैक्षणिक धोरणातील बाबी जनतेच्या विचारासाठी आमच्या विभागाच्या वतीने वेबसाईटवर टाकण्यात आल्या आहेत, त्यामुळे धोरणाचा अंतिम मसुदा ठरविताना त्यांच्या मतांचाही नक्कीच विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
धोरणाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक संघटनांनी आपली मते मांडली. त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा भवितव्याच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील संबंधितांनी वेबसाईटच्या माध्यमातून आपली मते व सूचना मांडाव्यात, जेणेकरून प्रस्तावित शैक्षणिक धोरण प्रभावी होऊ शकेल, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.