‘त्या’ अधिकाऱ्यांना परत पाठवा

By admin | Published: July 18, 2016 03:24 AM2016-07-18T03:24:55+5:302016-07-18T03:24:55+5:30

महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले

Send those officers back | ‘त्या’ अधिकाऱ्यांना परत पाठवा

‘त्या’ अधिकाऱ्यांना परत पाठवा

Next


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा महासभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत, त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही निवेदन दिले आहे.
सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कुठलेही काम करीत नाहीत. महापालिके चे नियम त्यांना माहीत नाहीत. यात महापालिकेची प्रत्येक कामे सरकारकडे पाठवण्याचा निर्णय होत असल्याने सामान्य प्रशासनाचे उपायुक्त दीपक पाटील, मिलिंद धाट, परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती रखडल्याबाबत त्यांनी या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. प्रशासनाचे काम पूर्णत: ढिम्म झाल्याने नागरिकांमध्ये नगरसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हे अधिकारी करीत असल्याने या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला जाईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
>महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत मौन का?
सरकारचे अधिकारी काम करीत नसल्याने नगरसेवकांची प्रतिमा मलिन होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यात त्यांनी सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जाधव यांनी तोफ डागली असली तरी ध्वनिचित्रफीत माध्यमातून महापालिकेचे अधिकारी दीपक भोसले आणि पी.के. उगले यांच्या उघड झालेल्या लाचखोरीबाबत जाधव यांचे मौन का, असा सवाल पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त संजय घरत व प्रभारी सचिव सुभाष भुजबळ यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली आहे. या अधिकाऱ्यांच्या एकंदरीतच प्रतापामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली, असे जाधव यांना वाटत नाही का, असा मुद्दाही चर्चिला जात आहे.
‘ते’ अधिकारी नेहमीच रोषाचे बळी
आतापर्यंतचा इतिहास पाहता सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी नेहमीच नगरसेवकांच्या रोषाचे बळी पडताना दिसतात. मात्र, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांची सहानुभूतीची भूमिका दिसून येते. शिवसेना गटनेते जाधव यांच्या निवेदनावरून हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

Web Title: Send those officers back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.