ईडीची नोटीस पाठविणे ही आजची फॅशनच - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 08:03 PM2021-09-25T20:03:50+5:302021-09-25T20:04:17+5:30
Supriya Sule on ED Notice : ईडीची नोटीस पाठविणे ही एक फॅशन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.
बुलडाणा: भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यास लगेच ईडीची नोटीस येण्याचे प्रकार वाढले आहे. एक प्रकारे पोस्टकार्डप्रमाणे त्या मिळत आहेत, या देशात ईडीची नोटीस पाठविणे ही एक फॅशन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.
बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिलेदार निष्ठेचे या कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या. त्यावेळी निवडक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी शनिवारी उपरोक्त विधान केले. बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे त्यांच्या समवेत होते.
ईडीकडून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना नोटीस पाठविण्यात येत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्याही मध्यंतरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले होते. त्यासंदर्भाने सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अलिकडील काळात ईडीकडून नोटीस दिल्या जात आहे. पोस्टकार्डप्रमाणेच त्या आजकाल मिळत असल्याने या नोटीस पाठविण्याची एक फॅशनच भारतात झाल्याचे त्या म्हणाले. किरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी विरोधात भाजप वापर करते आहे का? या बाबत विचारणा केली असता या मुद्द्यावर आपण बोलणार नाही. सोमय्यांना आम्ही विरोधत करत नाही केले तर त्यांचे स्वागतच करू. पुण्यातही ते आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही विरोध नाही तर त्यांचे स्वागतच केले होते, असे त्या म्हणाल्या.
अेाबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता आमचे नेते छगनजी भुजबळ या मुद्द्यावर पाठपुरावा करत आहे. केंद्राकडून इंम्पीरिकल डाटा मिळत नसल्याबाबत त्यांना विचारले असता ही गंभीर बाब आहे. महाविकास आघाडीतर्फे गेल्या एक वर्षापासून यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. महाविकास आघाडीमधील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन या विषयासह अन्य विषयावर काम करण्याची आमची भूमिका असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.