उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवताय, आधी हे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:42 AM2024-04-15T08:42:07+5:302024-04-15T08:42:29+5:30
वर्षभरातील अभ्यासाच्या श्रम परिहारातून कुठेतरी सुटीचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक हेतू मात्र व्यावसायिक लाभ उठविणाऱ्या साहसी शिबिर आयोजकांच्या पथ्यावर पडतो.
जयवंत कुलकर्णी, समुपदेशक
एप्रिल - मे, जून महिने म्हटले की, पालक मुलांसाठी गावचा प्रवास, एखादी कौटुंबीक सहल, दूरच्या भटकंतीचे प्लॅनिंग किंवा उन्हाळी शिबिरे, छंद वर्ग यांसारख्या पर्यायांच्या शोधात असतात. त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची त्यांची तयारीदेखील असते. वर्षभरातील अभ्यासाच्या श्रम परिहारातून कुठेतरी सुटीचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक हेतू मात्र व्यावसायिक लाभ उठविणाऱ्या साहसी शिबिर आयोजकांच्या पथ्यावर पडतो. अनेकदा पालकांकडून अशा शिबिरांत मुलांना देऊ केलेल्या सोयीसुविधांची शहानिशा केली जातेच असे होत नाही. त्यातून फसवणूक, बेजबाबदारी, अपघात, गैरसोय किंवा मूळ हेतूच बाजूला राहिल्याचा अनुभव पदरी पडतो. सुटीचा आनंद तर दूरच, परंतू हुरहूर, ताणतणाव, मन:स्ताप किंवा कायमची अद्दल घडावी - ‘कुठून दुर्बुद्धी झाली’, असे प्रसंग घडतात, अशा वेळी पालकांचे उत्तरदायित्व अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पालकांनी ही खबरदारी घ्यायलाच हवी
- आयोजक संस्था नोंदणीकृत असल्याची खात्री करा.
- शिबिराचे आयोजक, ठिकाण, प्रशिक्षक यांचा संपर्क कसा असेल.
- शिबिराच्या प्रशिक्षकांचा अनुभव व दर्जा.
सुरक्षिततेच्या सोयी सुविधा
पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे, भौतिक सुविधा, लाइफ गार्ड, डॉक्टर्स तसेच वैद्यकीय प्रथमोपचाराची व्यवस्था, पुरविली जाणारी साधने, राइड्स, यांत्रिक उपकरणांची मजबुती, खाद्यपदार्थ, अपघात प्रतिबंधक उपाययोजना इत्यादींची खातरजमा करणे आवश्यक आहे. घरापासून अंतर, जाण्या - येण्याच्या सोयी, शिबिराचा कालावधी, मुलांना ने - आण करण्याची जबाबदारी यांची स्पष्टता हवी. शिबिरात घेतले जाणारे उपक्रम, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, मनोरंजनात्मक कार्यक्रम यातील मुलांचा प्रत्यक्ष सहभाग नेमका किती व कशा स्वरुपाचा असेल. त्याचे वेळापत्रक नक्की तपासावे. एकूण रुपरेषा समजून घ्यावी.
मोठ्या वयोगटाच्या मुलांसाठी रायफल शूटिंग, वेट लिफ्टिंग, आर्चरी, जलतरण, तलवारबाजी, नेमबाजी, घोडेस्वारी, रिव्हर क्रॉसिंग, पॅरा ग्लायडिंग व जम्पिंग, फायर सेफ्टी यांसारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश असल्यास सर्व प्रकारची सुरक्षितता तपासून पाहणे आवश्यक आहे.
लहान वयोगटाच्या मुलांसाठी स्पर्धात्मक साचांचे मनोरंजक खेळ, वारली पेंटिंग, स्केचिंग, ओरेगामी, माती काम, रंगकाम, स्केटिंग, कॅलिग्राफी, काव्यवाचन, गायन, अभिनय, मूर्तिकाम, बुद्धिबळ, कथाकथन, वाद्यवादन, नृत्य यासारखे छंद वर्ग हल्ली अत्यल्प मोबदला घेऊन शाळाशाळांमध्ये आयोजित केले जातात. त्यांना प्राधान्य देण्यात कोणतीही हरकत नसावी. त्यातून अपेक्षित हेतू साध्य तर होतोच, शिवाय वेळ, पैसा, सुरक्षितता याविषयी ताण येत नाही.