सेनेची सरकारविरोधी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 05:45 AM2016-11-16T05:45:28+5:302016-11-16T05:45:28+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नागरिकांच्या होत असलेल्या प्रचंड गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी तृणमूलच्या नेत्या
मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नागरिकांच्या होत असलेल्या प्रचंड गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्र्जींची भेट घेणार असून शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत असणार आहेत.
तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नोटाबंदीवरुनच्या आंदोलनात आम्हाला साथ द्या, असे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलविली. नोटाबंदीच्या मुद्यावर ममता बॅनर्जी राष्ट्रपतींना भेटणार असून त्यांच्यासोबत जाण्याचे आदेश ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार चालतात तर आम्हाला ममता बॅनर्जी का नाही, असा सवालही ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांनी भेट घ्यावी असेही उद्धव यांनी खासदारांना सांगितल्याचे समजते.रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना रोकड घेण्यास मनाई केली आहे. जुन्या नोटा जिल्हा बँकांनी घेऊ नयेत असे आदेशत देण्यात आलेले आहेत. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्व सामान्य शेतक-यांचा पैसा जिल्हा बँकेत आहे. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने त्याची अडवणूक कशासाठी असा प्रश्न करीत जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी बुधवारी पंतप्रधानांना भेटून निवेदन द्या असे आदेश द्यांनी खासदारांना दिले. तसेच जिल्हा बँकांवरील मनाई उठवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असेही ठाकरे म्हणाले.
नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचे चटके सर्वसामान्य माणसाला बसत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना जनतेसोबत आहे. हा सर्वच पक्षांचा मुद्दा आहे. नोटाबंदीनंतरची परिस्थिती केंद्र सरकारला नीट हाताळता न आल्याने जनतेत प्रचंड रोष आहे आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना मागे राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली. (विशेष प्रतिनिधी)