सेनेत राडा-रडी! आमदार-मंत्र्यांत खडाजंगी, उद्धव ठाकरेंनी सुनावले नेत्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:20 AM2017-09-19T06:20:34+5:302017-09-19T06:21:45+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.
अतुल कुलकर्णी
मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.
‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून सर्वांचे मोबाइल बंद ठेवण्यात आले होते. प्रारंभीच आमदारांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर लावला. आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंत्र्यांनी पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. मंत्री आमची कामे करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
त्यावर मंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. ‘आम्हाला मंत्री बनण्याची खाज नाही, जे मंत्री तुमची कामे करत नाहीत त्यांची नावे घेऊन बोला. सगळ्यांना एकाच पारड्यात का मोजता?’ असे रामदास कदम यांनी खडसावले. त्यावर ‘मला उद्धव ठाकरेंनी विचारले, तर नाव सांगेन. तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न आ. गोगावले यांनी केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.
>नीलम गो-हेंना अश्रू अनावर
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली नव्हती म्हणून आ. नीलम गो-हे पुण्याहून चितळेंचे पेढे घेऊन बैठकीला आल्या होत्या. पेढे-पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. बैठकीत खा. श्रीरंग बारणे यांनी गो-हे यांच्याविरोधात ‘कॉमेन्ट’ केल्याने दोघांत शाब्दिक चकमक उडाली. स्वत: उद्धव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. बैठक संपल्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली, त्या वेळी ‘हे असले वागणे आम्ही कसे सहन करायचे?’ असे म्हणत नीलम गो-हे यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
>निवडणूक नको
काही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. त्याला आ. शंभूराजे देसाई, आ. राजेश क्षीरसागर यांनी विरोध केला. सरकार पाडून निवडणुकीला कसे सामारे जायचे? हवे तर ज्या मंत्र्यांबद्दल नाराजी आहे त्यांना दूर करा, अशा सूचना त्यांनी केल्याचे समजते.
>सर्वांशी बोलून निर्णय : उद्धव
कधी सत्तेतून बाहेर पडा म्हणता, कधी सत्तेत राहा म्हणता. आपापसांत भांडता. हे चालणार नाही. मुख्यमंत्री गोड बोलतील, पण तुमची कामे करणार नाहीत. उद्यापासून विभागवार आमदारांच्या बैठका घेईन. सर्वांशी बोलून माझा निर्णय जाहीर करेन.
>सत्तेत राहायचे की नाही, लवकरच ठरेल!
महागाई वाढली आहे. गोरगरिबांच्या चुली बंद पडत असतील, तर सत्तेत कशासाठी राहायचे? अनेक आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महागाईविरुद्ध राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या पोटावर उठणाºयांसोबत सत्तेत राहायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. आम्ही गरिबांच्या चुली बंद पडू देणार नाही. - खा. संजय राऊत
>नेमके काय घडले?
खा. श्रीरंग बारणे आणि खा. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार, अशी सध्या चर्चा आहे. स्वत: खा.बारणे यांनीच बैठकीत हा विषय उपस्थित केला. त्यावर, आढळराव पक्ष सोडणार नाहीत, असे आ. गोºहे यांनी ठामपणे सांगितले. त्यांचे हे विधान बारणे यांना चांगलेच झोंबले. ‘तुम्ही कशाला मध्ये बोलता, तुम्ही तर लक्ष्मण जगताप यांना तिकीट द्यायला निघाला होतात,’ असा टोमणा खा. बारणे यांनी मारला. त्यावरून उभयतांमध्ये चांगलीच जुंपल्याचे बैठकीत असलेल्या नेत्याने सांगितले.