सेनेला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला औरंगाबादेत अमान्य
By Admin | Published: January 21, 2017 12:41 AM2017-01-21T00:41:32+5:302017-01-21T00:41:32+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विजय सरवदे,
औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाभरात या निवडणुकीचाच माहोल आहे. असे असले तरी युती-आघाडीबद्दल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परवापर्यंत शिवसेना - भाजपा युतीसंबंधी झालेल्या दोन्ही बैठका फिसकटल्या आहेत. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युल्यावर सेना ठाम आहे, तर या वेळी दोन आमदार आणि दोन नगराध्यक्ष, नगरसेवक वाढले असल्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली असल्याचा दावा करून भाजपाने शिवसेनेपुढे ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवला आहे. भाजपाचा हा फार्म्युला मात्र शिवसेनेला अमान्य आहे.
नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्यातरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे वाढले आहेत. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे.
सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०, शिवसेना-१९, भाजपा-६, मनसे-७ आणि अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, मनसेच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता खेचून घेतली.
गेल्या पाच वर्षांत घडलेल्या झेडपीतील अनेक घडामोडी राजकीय पटलावर लक्षवेधक ठरल्या. काँग्रेसने खेचून आणलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे निवडून आलेल्या उमेदवारांपैकी चार जण काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.
।अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच बाद
औरंगाबाद जिल्हा परिषदेत पूर्वी ६०
गट व १२० गण होते. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची नव्याने फेररचना केल्यानंतर आता दोन गट व चार गण वाढले आहेत.
त्यानुसार ६२ गट व १२४ गण निर्माण झाले. औरंगाबाद तालुक्यात आता १० गट, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात ९, वैजापूर तालुक्यात ८, खुलताबाद तालुक्यात ३, फुलंब्री तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ८, सिल्लोड तालुक्यात ८ आणि सोयगाव तालुक्यात ३ गट झाले आहेत.
गट व गणांच्या फेररचनेनंतर आरक्षणही नव्याने निश्चित झाले असून, अनेक ठिकाणी मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला गेला तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.