सेनेला ‘मुका’मार!
By admin | Published: September 28, 2016 05:31 AM2016-09-28T05:31:13+5:302016-09-28T05:31:13+5:30
सकल मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच व्यंगचित्र
मुंबई : सकल मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आ. संजय रायमूलकर (मेहकर) आणि आ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याने शिवसेनेत भूकंप झाला आहे.
मात्र शिवसेनेकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे. दरम्यान, नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी ‘मातोश्री’वर तातडीने बैठक आयोजित केल्याचे समजते. राज्यात ठिकठिकाणी ‘सामना’च्या अंकांची होळी करण्यात येत असतानाच मंगळवारी दुपारी सामनाच्या वाशी येथील कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक केली, तर ठाण्यातील कार्यालयावर शाई फेकली. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (विशेष प्रतिनिधी)
उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा
पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा क्रांती मूक मोर्चासंबंधी छापून आलेले आक्षेपार्ह व्यंगचित्र संतप्त करणारे असून, या प्रकरणी ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तत्परता सरकारने दाखवावी. तसेच या प्रकरणी ठाकरेंनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
शिवसेनेने माफी मागावी :
मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयाची व्यंगचित्रातून टिंगलटवाळी करून या मोर्चात सहभागी लाखो माता-भगिनींचा अवमान करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करीत, शिवसेनेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यभरात निघणारे सकल मराठा समाजाचे मोर्चे हा टिंगलीचा विषय नाही, असे चव्हाण यांनी शिवसेनेला खडसावले.
राजीनामे दिलेच...
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर
व सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पक्षप्रमुखांकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. खासदार जाधव यांच्या राजीनाम्यास त्यांचे पुत्र हृषीकेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ते म्हणाले की, गटनेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत तातडीने बोलविलेल्या बैठकीला ते उपस्थित असून, रात्री उशिरा पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आमदार खेडेकर यांनीही आपण राजीनामा दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र ‘सामना’त छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं.- नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना