एकाकीपणाला कंटाळून ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या, 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन संपवलं जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 08:08 PM2017-08-24T20:08:55+5:302017-08-24T20:10:23+5:30
एकाकीपणाला कंटाळून फिरोझ आदिसार गांधी या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पोखरण रोड भागात गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
ठाणे,दि.24 - एकाकीपणाला कंटाळून फिरोझ आदिसार गांधी या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पोखरण रोड भागात गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘नीळकंठ हाईट’ या २१ मजली इमारतीमध्ये गांधी हे वास्तव्याला होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर ते डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील घर सोडून उपवन परिसरातील आपल्या मुलीच्या इमारतीशेजारी वास्तव्याला आले होते. त्यांची मुलगी आणि जावई हे याच इमारतीच्या दुसºया विंग मध्ये वास्तव्याला आहेत. वृद्धापकाळ आणि एकाकीपणा यातून आलेल्या नैराश्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तकनगर पोलिसांनी वर्तविली आहे. तर आपले वडील फिरोझ हे एकटे जरी असले तरी ते आरोग्याची काळजी घेत होते. ते सकाळी फेºया मारण्यासह व्यायामही करीत होते. त्यामुळे ते आत्महत्या करण्याची शक्यता फारच कमी असल्याचे मत त्यांची मुलगी अनायता मेहता यांनी पोलिसांकडे व्यक्त केले आहे. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला होता. या तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले. उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
सूर्याला प्रार्थना करतांना अपघात?
पारशी समाजाच्या गांधी यांना दररोज सकाळी सूर्याला वाकून प्रार्थना आणि नमस्कार करण्याची होती. ते आपल्या रुमच्या गॅलरीत येऊन ही प्रार्थना करायचे. या गॅलरीला केवळ तीन ते चार फुटांचे लोखंडी गज असल्यामुळे नमस्कार करण्यासाठी वाकल्यानंतरही तोल जाऊन ते खाली कोसळले असल्याची शक्यताही त्यांच्या निकटवर्तीयांनी वर्तविली आहे.
दोन महिन्यातील तिसरी घटना...
२० पेक्षा अधिक मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची गेल्या दोन महिन्यातील ठाण्यातील ही तिसरी घटना आहे. आईच्या मृत्यूने वैफल्यग्रस्त झालेल्या हेतल परमार (३७) या विवाहितेने माजीवड्यातील रुस्तमजी अरबेनिया या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. तर घोडबंदर रोडवरील हिरानंदानी मेडोज वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरुन पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा १ आॅगस्ट २०१७ रोजी मृत्यू झाला. बाल्कनीत टाकलेला टॉवेल घेण्यासाठी ती वाकल्यानंतर पाय घसरल्याने खाली कोसळल्याची शक्यता तिच्या कुटूंबियांनी वर्तविली होती.