ज्येष्ठ नागरिक असुरक्षितच एनसीआरबीचा अहवाल; अत्याचारात देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:21 AM2023-12-06T09:21:52+5:302023-12-06T09:22:10+5:30
एनसीआरबीने २०२२ मध्ये घडलेल्या गुह्यांची आकडेवारी जारी केली. यामध्ये देशभरात ३५,६१,३७९ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांवरील अत्याचाराचे ५ हजार ५८ गुन्हे नोंद झाले आहेत. यावर्षी मध्य प्रदेश (६,१८७) पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, तर मुंबईही दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एनसीआरबीने २०२२ मध्ये घडलेल्या गुह्यांची आकडेवारी जारी केली. यामध्ये देशभरात ३५,६१,३७९ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश (४,०१७८७) पाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा (३,७४,०३८) दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २८ हजार ५४५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात ५०५९ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ६,१९० असून महाराष्ट्र पहिल्या स्थानी होता. यावर्षी मध्य प्रदेश (६,१८७) आघाडीवर आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२०२२ मध्ये १८३ वृद्धांंच्या हत्येची नोंद करण्यात आली आहे. दरोडे घालण्याच्या १५ घटना समोर आल्या. तर वृद्धांंना लक्ष्य करत चोरीचे १ हजार २८८ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या ३५६ गुन्ह्यांची नोंद यात करण्यात आली आहे. वृद्धांंच्या विनयभंगाच्या ५१ तर बलात्काराचे ११ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत. फसवणुकीचे ८४० गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद झाले आहे. यात, मुंबई शहरात वृद्धांंवरील अत्याचाराचे एकूण ५७२ गुन्ह्यांची नोंद आहे.