सत्ता मिळाल्यास ज्येष्ठ नागरिक, अल्पभूधारक शेतक-यांसाठी पेन्शन
By Admin | Published: October 5, 2014 01:46 AM2014-10-05T01:46:06+5:302014-10-05T01:53:13+5:30
अजित पवार यांचे आश्वासन; वाशिम जिल्ह्यात प्रचारसभा.
वाशिम : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास ६५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी यांच्याकरिता पेन्शन योजना सुरू करू. गतिमान शासन, पारदर्शक व दर्जेदार कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ३ ऑक्टोबर रोजी वाशिम, मालेगाव व कारंजा येथे वाशिम जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये दिले.
कारंजा येथील कॅन्सर रिलीफ सेंटरच्या मैदानात, वाशिम येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तर मालेगाव येथे बालाजी लॉन येथे अजित पवार यांच्या सभांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना विविध कायदे व योजना अंमलात आणल्या. यामध्ये सावकारी विरोधी कायदा, राजीव गांधी जीवनदायी योजना, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठयाच्या विविध योजनांचा समावेश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले . कारंजा येथील सभेचे प्रास्ताविक सुभाष ठाकरे व संचालन दिलीप सावजी राऊळ यांनी केले, तर आभार जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मानले.