शिवशाही बसेसच्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना मिळणार भरघोस सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 03:32 PM2018-05-29T15:32:40+5:302018-05-29T15:37:45+5:30
एस.टी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी च्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अाणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
मुंबई : एस.टी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी च्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अाणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
सध्या एस.टी च्या साध्या, रातराणी व निमआराम बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसेसमध्ये सुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत दिवाकर रावते यांनी याबाबत एस.टी प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
येत्या १ जून, २०१८ रोजीपासून म्हणजे एस.टी च्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.