'अलबत्या गलबत्या'चे लेखक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 05:40 PM2018-06-22T17:40:37+5:302018-06-23T06:25:35+5:30
साहित्यविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.
मुंबई : साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी विभागात ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी यांना बालसाहित्यातील सर्वांगीण योगदानासाठी, तर नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीस ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला आहे.
देशातील ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये बालसाहित्य पुरस्कारांसाठी २१, तर युवा पुरस्कारांसाठी २१ साहित्यिकांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रत्नाकर मतकरी यांनी बालसाहित्यासाठी जे योगदान दिले, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
बालसाहित्य पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून मराठी विभागाकरिता बाबा भांड, डॉ. अनिल अवचट, डॉ. वसंत पाटणकर यांनी, तर साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी वसंत आबाजी डहाके, रा. रं. बोराडे, सतीश आळेकर ज्युरी म्हणून काम पाहिले. बालसाहित्याचे पुरस्कार १४ नोव्हेंबरला बालदिनी प्रदान केले जाणार आहेत. युवा पुरस्कारांच्या वितरणाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. इंग्रजी साहित्यकृतीसाठी यंदा कोणत्याही पुस्तकाला युवा साहित्य पुरस्कार देण्यात आला नाही.
>बालनाट्याचे लिखाण करून जवळपास ४० वर्षांचा कालावधी लोटला. या लिखाणाबद्दल, या क्षेत्रातील योगदानाविषयी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, ही दखल काहीशी उशिरा घेतली, याची खंत कायम मनात राहील.
- रत्नाकर मतकरी
>साहित्य अकादमीने ‘फेसाटी’ कादंबरीची दखल घेतल्याने आनंद झाला. या निमित्ताने खेड्यापाड्याचे, दुष्काळी भागाचे व शेतकरी वर्गाचे जीवन साहित्यातून मांडता आले. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.
- नवनाथ गोरे
Press release regarding winners of Sahitya Akademi Bal Sahitya Puraskar, 2018.@dr_maheshsharma@MinOfCultureGoI@ksraosahityapic.twitter.com/Xyjtg0njmu
— Sahitya Akademi (@sahityaakademi) June 22, 2018