बदली, बढतीची अधिकाऱ्यांची कामे मंत्रीच करताना दिसतात - नितीन गडकरींची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:46 AM2018-05-05T05:46:32+5:302018-05-05T05:46:32+5:30
अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.
मुंबई - अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.
जागतिक मराठी चेम्बर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचा २४ वा वर्धापन दिन व उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाले. गडकरी म्हणाले, उद्योग करण्यासाठी हिंमत ठेऊन जोखीम पत्करावी लागते. मराठी माणसात प्रचंड क्षमता आहे. इनोव्हेशन, तंत्रज्ञान व संसाधने ही आगामी काळाची गरज आहे. ती ध्यानात घेत मराठी माणसाने स्वत:ला उद्योग क्षेत्रात झोकून द्यावे.
मराठी माणसाने टाटा-बिर्लाला मागे टाकावे, असे आवाहन लोकसभेचे माजी सभापती व चेम्बरचे अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांनी केले.
महाराष्टÑ उद्योगात देशात अव्वल आहे. पण त्यामध्ये मराठी उद्योजक नाहीत. मराठी माणूस खूप शिकतो. पण शेवटी तो फक्त नोकरीच करतो. प्रत्येक मराठी घरात एक व्यवसायिक तयार व्हायला हवा, असे आवाहन जोशी यांनी केले.
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महिला उद्योजिका जयंती कठाळे, म्हैसूर येथील उद्योजक मोहन राव व प्रकाश बेहरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेम्बरचे कार्याध्यक्ष खा. शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश चिखलीकर, रविंद्र आवटे, सुरेश महाजन यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गडकरींनी
पुढाकार घ्यावा - डॉ. डी. वाय. पाटील
देशात १८५७ चे बंड झाले नसते तर आज पाणीप्रश्न निर्माणच झाला नसता. देशाची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १८५४ मध्ये ब्रिटीशांनी आरखडा तयार केला होता. बंड होताच तो आराखडा रद्द करण्यात आला. गडकरींनी प्रयत्न केल्यास आताही तो आराखडा अंमलात आणून पाणीप्रश्नावर तोडगा काढता येईल, असे मत उद्योगरत्न पुरस्कार विजेते
डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
‘गडकरींनी पंतप्रधान व्हावे’
नेटाने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे सांगताना मनोहर जोशी यांनी नितीन गडकरींनी पुढील वेळी पंतप्रधान बनून या कार्यक्रमात यावे, असे मत मांडले. त्यावर आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण गडकरींनी दिले.
मराठी माणसात उद्यमशीलतेचा अभाव
मराठी माणसाच्या घरातच उद्यमशीलतेचा अभाव आहे. मराठी तरुण कायम नोकरीच्याच मानसिकतेमध्ये असतो. माझे जावईदेखील अमेरिकेत नोकरी करतात. पण त्यांना उद्योग करायचा नाही, असे गडकरी म्हणाले.