महानगरपालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: June 11, 2016 02:53 AM2016-06-11T02:53:11+5:302016-06-11T02:53:11+5:30
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. प्रथमच काही संस्थानिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागात पाठविले असून विभाग कार्यालयांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी एक महिन्यात प्रशासनातील बेशिस्तपणा मोडीत काढला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. मुख्यालय व प्रशासन उपायुक्त पदावर अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या जगन्नाथ सिन्नरकर यांच्याकडे आता मालमत्ता, वाहन व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण व निवडणूक विभागाचे उपायुक्त अंबरीश पटनिगिरे यांच्याकडे परिमंडळ दोनचे उपायुक्तपद सोपविण्यात आले आहे. मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांच्याकडे क्रीडा व सांस्कृतिक उपायुक्तपद सोपविण्यात आले आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपविली आहे.
आयुक्तांनी पालिकेची विभाग कार्यालये सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे विभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी आता सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे यांच्याकडे दिघा, अशोक मढवी यांच्याकडे कोपरखैरणे, चंद्रकांत तायडे यांच्याकडे ऐरोली व दिवाकर समेळ यांच्याकडे घणसोली विभाग अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली. सोमवारपासून बदली झालेले सर्व अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संस्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)