वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाने आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 05:46 AM2018-08-11T05:46:48+5:302018-08-11T05:47:00+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी एका प्रकरणावरून खडसावल्याने नैराश्येपोटी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
ठाणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी एका प्रकरणावरून खडसावल्याने नैराश्येपोटी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. दरम्यान, दरेकर यांची ठाणे शहर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.
कापूरबावडी परिसरातील हॉटेल आमराई येथे १५ दिवसांपूर्वी हाणामारीचा एक प्रकार घडला होता. हा तपास उपनिरीक्षक देशमुख यांच्याकडे होता. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न करूनही ते त्यांना मिळाले नव्हते. यासाठी दरेकर यांनी त्यांना वारंवार आदेशही दिले होते. अखेर, या प्रकरणातील चौघे आरोपी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याकडे हजर झाले होते. आता या आरोपींना तातडीने अटक करा आणि न्यायालयात त्यांना हजर करा, असे आदेश दरेकर यांनी देशमुख यांना दिले. मात्र, त्यांना स्टेशन हाउस ड्युटी (ठाणे अंमलदार) असल्यामुळे त्यांनी आजऐवजी उद्या (शनिवारी) अटक करते, असे सांगितले. त्यानंतर, दरेकर यांनी देशमुख यांना फैलावर घेतले.
रागाच्या भरात दरेकर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे त्या शांत राहिल्या. नंतर त्या स्टेशन हाउसमध्ये येऊन रडल्या. काही वेळाने पोलीस ठाण्यातील डायरीमध्ये तब्येत बरी नसल्यामुळे घरी जात आहे. त्यामुळे पुढील कर्तव्य करूशकत नसल्याची नोंद करून त्या वर्तकनगर येथील आपल्या घरी परतल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी फिनाइल कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात ११.३० वा.च्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. याबाबत, दरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
>दरेकर यांची बदली
या प्रकरणाची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश त्यांनी वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिले आहेत. चौकशी होईपर्यंत दरेकर यांना नियंत्रण कक्षामध्ये हलवण्यात आले आहे. तोपर्यंत कल्याणराव कर्पे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची प्रभारी सूत्रे राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.दरेकर यांच्याविरुद्ध आणखीही काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी असून ते अगदी क्षुल्लक कारणावरूनही अधिकारी, कर्मचाºयांना धारेवर धरत असल्याची माहिती याच पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाºयाने ‘लोकमत’ला दिली.
>एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याच्या वादावादीतून नैराश्येपोटी देशमुख यांनी फिनाइल प्राशन केले. या प्रकरणी चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट