वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता येणार ट्विटरवर
By admin | Published: June 9, 2016 01:16 AM2016-06-09T01:16:16+5:302016-06-09T01:16:16+5:30
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे शहर पोलिसांच्या ट्विटर हँडलचे गेल्या आठवड्यात उद्घाटन झाले़
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे शहर पोलिसांच्या ट्विटर हँडलचे गेल्या आठवड्यात उद्घाटन झाले़ त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आता सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ट्विटर अकाऊंट सुरू करून त्यावर सक्रिय होण्याचा आदेश दिला असून, ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांना तत्काळ उत्तर द्या, असेही सांगितले आहे. गुन्हेविषयक आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरात वाढलेल्या घरफोडी आणि इतर गुन्ह्यांचा आढावा घेतला.
स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट पोलिसिंग करण्याची घोषणा आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे शहर पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारताना केली होती़ या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी सर्वप्रथम शहर पोलिसांचे नवीन संकेतस्थळ सुरू केले. त्यानंतर फेसबुक पेज आणि ट्विटर हँडल सुरू करण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्याचे वेगळे अकाऊंट असावे तसेच संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी त्यावर सक्रिय व्हावे, असे सांगण्यात आले आहे.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपासून एकही सोनसाखळी चोरीची घटना घडली नाही, तसेच इतर सर्व गुन्ह्यांचा छडा लागला आहे अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या, याबाबत विचारले. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमक्या कशा प्रकारे पेट्रोलिंग केले तसेच गुन्हे कशा पद्धतीने उघडकीस आणले, हे उपस्थितांना सांगितले. ज्या परिसरातील घरफोड्या आणि इतर गुन्हे वाढले आहेत, त्या संबंधित
पोलीस ठाण्यांची नावे बैठकीत
वाचून दाखविण्यात आली. बैठकीला सहआयुक्त सुनील रामानंद
यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
>उपाययोजना करा
आगामी सणाच्या पार्श्वभूमीवरदेखील आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.
शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना आखण्यास सांगितले आहे.
पोलीस आयुक्तालयात नव्यानेच हजर झालेल्या अधिकाऱ्यांनादेखील आयुक्तांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले.