ज्येष्ठ संशोधक, लेखक डॉ. रा.चिं. ढेरेंचे पुण्यात निधन
By Admin | Published: July 1, 2016 08:59 AM2016-07-01T08:59:54+5:302016-07-01T09:48:55+5:30
ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व लेखक रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर या कन्या आहेत. त्यांच्या निधनामुळे नव्या पिढीला साहित्य व इतिहासाशी जोडणारा महत्वपूर्ण दुवा निखळल्याची हळहळ साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.
मागच्या काही दिवसांपासून ढेरे यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर आज राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविदया संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. या विषयांवर विपुल लेखन करीत त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली. ११.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मसाप येथे ठेवण्यात येईल. तर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
योगदान : प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, लोकसंस्कृतीचे मीमांसक म्हणून डॉ. ढेरे प्रसिद्ध होते. प्राचीन व मध्ययुगीन संस्कृतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न ते गेल्या ६० वर्षांपासून करत होते. या काळात त्यांनी आपल्या विषयांशी संबंधित मोठ्या प्रमाणावर लेखन केलं. प्राचीन साहित्य, संस्कृती, लोकसाहित्य, लोकसंस्कृती या विषयांच सहज-सोपं विश्लेषण करून डॉ. ढेरे यांनी हे विषय सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले.
पुण्याशी नातं : डॉ.ढेरे पुण्यातच वाढले, त्यांची कर्मभूमीही पुणेचं. वि.का.राजवाडे, श्री.व्यं.केतकर या थोर संशोधकांचा वारसा त्यांनी चालवला. त्यांच्या रुपाने एक चतुरस्त्र, आधुनिक व सर्जनशील रीतीने काम करणारा संशोधक पुण्याला मिळाला.
अज्ञात पैलू : संशोधन व लिखाणात झोकून देणारे डॉ. ढेरे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असत, पण संशोधनात रस असणारं कोणी त्यांना घरी भेटायला गेलं, तर ते त्या व्यक्तीश मनमोकळ्या गप्पाही मारत असत. त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी संशोधनसाठी विषयांचं एक टिपणच नवीन संशोधकांसाठी उपलब्ध करून दिलं. तरूण अभ्यासकांना लागेल ती मदत करण हा त्यांचा आगळा गुण होता.
रा.चिं. ढेरे यांची साहित्यसंपदा :
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्री तुळजाभवानी, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, आज्ञापत्र, त्रिविधा, लज्जागौरी, श्रीनाथलीलामृत,
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, स्वामी समर्थ, श्री व्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर, लोकसंस्कृतीचे उपासक व अन्य
पुरस्कार :
साहित्य अकादमी १९८७, पुण्यभूषण पुरस्कार, जी ए सन्मान, पुणे मनपा वाल्मिकी पुरस्कार, मसाप गं ना जोगळेकर पुरस्कार