ज्येष्ठ सनईवादक तिप्पाण्णा मुळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 11:46 PM2017-01-02T23:46:41+5:302017-01-02T23:46:41+5:30
मिरजेतील किराणा घराण्याचे ज्येष्ठ सनईवादक पंडित तिप्पाण्णा सदााशिव मुळे (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी येथे निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 2 - मिरजेतील किराणा घराण्याचे ज्येष्ठ सनईवादक पंडित तिप्पाण्णा सदााशिव मुळे (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी येथे निधन झाले. गोवा आकाशवाणीचे कलाकार व सनईवादक सदाशिव मुळे यांचे ते वडील होत.
तिप्पाण्णा मुळे यांचा जन्म १२ जानेवारी १९४० मध्ये मिरजेत झाला. त्यांचे मूळ गाव विजापूर (कर्नाटक) जिल्ह्यातील सोदलबग्गी असून, त्यांना सनईवादनाचा वारसा घराण्यातूनच मिळाला. त्यांचे पूर्वज बाळू मुळे यांनी पुण्याच्या पेशव्यांच्या व मिरजेच्या पटवर्धन सरकारांच्या कालखंडात दरबारी कलाकार म्हणून सनईवादन केले. संगीतरत्न अब्दुल करीम खाँ व तिप्पाण्णा मुळे यांच्या वडिलांची मैत्री होती.
शालेय जीवनात तिप्पाण्णा मुळे यांना बासरीवादनाची आवड होती. बासरीवादनात अनेक बक्षिसे मिळविली होती. मात्र रागदारीची माहिती नव्हती. घनश्याम सुंदरासारखी अनवट गाणी ते बासरीवर वाजवत. सारंग, काफी, भैरवी, यमन या रागातील काही चिजाही बासरीवर बसविल्या होत्या. सातवी पास होऊन त्यांना शिक्षकांची नोकरी करायची होती. सातवीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे त्यांची शिक्षक होण्याची इच्छा अपुरी राहिली. शाळा सोडल्यानंतर त्यांनी सनई वाजविण्याचा निर्धार केला. त्यांचे चुलते सांगलीच्या पटवर्धन सरकारांकडे सनई-चौघडा वाजवत. त्यांनी तिप्पाण्णा यांना सनईवादनासाठी प्रोत्साहन दिले. सनईवादन करीत असताना शास्त्रीय पाया पक्का होण्यासाठी गुरुवर्य संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पत्नी बानू माँ यांच्याकडून त्यांनी सनईवादनाचे धडे गिरविले. पहाटे चारपासून सकाळी आठपर्यंत ते रियाज करीत असत.
१९६२ पासून सनईवादनात त्यांची प्रगती होत गेली. सनई वादनाचे धडे गिरविल्यानंतर अनेक समारंभामध्ये त्यांचे कार्यक्रम होत राहिले. त्यांच्या मैफिलीची सुरुवात ख्याल वादनाने होत असे. मियाँ की तोडी, शुध्द सारंग, मुल्तानी पुरिया, धनश्री, मारु बिहाग, शुध्द कल्याण, मालकंस हे त्यांचे आवडते राग होते. स्वत:ची शैली निर्माण करण्यासाठी तरुणांनी सनईवादनाकडे वळावे, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी मोफत सनईवादन शिकविण्याचीही त्यांची तयारी होती.
दरवर्षी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर व अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या संगीत सभा, अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, आकाशवाणीसह हुबळी, धारवाड, परभणी येथील कार्यक्रमांत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सांगलीत सप्तक निर्मित ह्यसा रे ग मह्ण कार्यक्रमातही त्यांचे सनईवादन झाले. १९८२ मध्ये ज्येष्ठ दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्याहस्ते त्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. सनईवादन कला टिकविण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मिरजेच्या हजरत ख्वॉजा शमना मीरासाहेब दर्ग्यात दररोज सकाळी व सायंकाळी सनईवादनाव्दारे सेवा केली. त्यांच्या पार्थिवावर येथील कृष्णाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (दि. ३) रोजी सकाळी नऊ वाजता कृष्णाघाट येथे रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.