ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

By admin | Published: January 3, 2015 02:53 AM2015-01-03T02:53:30+5:302015-01-03T02:53:30+5:30

स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले.

Senior Scientist Gowarikar passed away | ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

Next

पुण्यात अंत्यसंस्कार : अवकाश, हवामान, लोकसंख्या क्षेत्रात अमूल्य योगदान
पुणे : विज्ञानाच्या प्रांतातील संशोधनाच्या बळावर अस्सल स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अग्निबाणाच्या घन इंधनाचे निर्माते, हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ‘गोवारीकर मॉडेल’ची निर्मिती करणारा आणि भारतीय अस्मितेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानाची ओळख बहाल करणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.
रविवारी अचानक रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे बंधू ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर, चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर व छायाचित्रकार अविनाश गोवारीकर हे त्यांचे पुतणे व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. गोवारीकर यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदी महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांना गौरविले होते.

च्परदेशात डॉक्टरेट संपादन केल्यानंतर मातृभूमीच्या ओढीने ते भारतात परतले. डॉ. होमी भाभा हयात असताना १९६५ साली ते मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन केंद्रात (टीआयएफआर) रुजू झाले. पुढे त्यांनी अवकाश तंत्रज्ञान संशोधनावर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले. त्यानुसार स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या कामाला आकार देण्याचे काम त्यांनी सुरू केले.

अग्निबाणासाठी घन इंधनाची निर्मिती ही त्यांनी भारताला दिलेली देणगी मानली जाते. उपग्रह भूस्थिर करता करता याच उपग्रहांच्या साह्याने मान्सूनचा अचूक अंदाज बांधण्याचे मॉडेल त्यांनी विकसित केले. ते आजही गोवारीकर मॉडेल म्हणून ओळखले जाते.

 

Web Title: Senior Scientist Gowarikar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.