Maharashtra Politics: “मला शाश्वती आहे ते असा काही निर्णय घेणार नाहीत”; अण्णा हजारेंचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:49 PM2022-09-23T18:49:36+5:302022-09-23T18:52:27+5:30
Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकराने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेतला तर पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता महाविकास आघाडीच्या सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार विरोध केला होता. याबाबत अण्णा हजारे (anna hazare) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता, त्यावेळेस अण्णा हजारे यांनीही या निर्णयाला विरोध केला होता. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या निर्णयाचा मुद्दा समोर आला आहे. नवे शिंदे-फडणवीस सरकार सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अण्णा हजारेंना विचारणा करण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
अजून असा काही निर्णय आलेला नाही, आल्यानंतर पाहू
मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे बरोबर नाही. पूर्वी हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी तो थांबला. मला शाश्वती आहे, आता राज्यात जे सरकार आले आहे, ते मॉल आणि तेथे दारू विकायला ठेवयचा विचार करणार नाही, असा मला विश्वास वाटतो. जर तसा निर्णय झालाच तर आम्हाला नाइलाजास्तव आमच्या मार्गाने जावे लागेल. पण अजून असा काही निर्णय आलेला नाही. आल्यानंतर पाहू. मात्र, ही आमची संस्कृती नाही, असे अण्णा हजारेंनी सांगितले.
दरम्यान, सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी हा विषय पुन्हा पुढे आणला आहे. या निर्णयावर लोकांकडून आलेल्या हरकती व सूचनांची मोजदाद करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचे हितच साधले जाईल, असे म्हटले.