ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:45 AM2020-01-30T10:45:00+5:302020-01-30T11:17:59+5:30
महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले.
पुणे - महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळ्ख होती. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले होते. तसेच रुढी, परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार करत त्यांनी स्रियांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला. पुरोगामी विचारधारा घेऊन त्यांनी समाजात जनजागृती करण्याचे काम आपल्या लेखणी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून केले.महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सुरुवातीला किर्लोस्कर मासिकातून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या त्या 30 वर्ष संस्थापक संपादिका होत्या.
स्त्री-पुरुष समानतेसाठी मोठा लढा
भारतातील विविध मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या निकालात त्यांना यश आले होते. सर्वसामान्यपणे साजऱ्या होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमांना विरोध होता. त्याऐवजी प्रौढ कुमारिका, विधवा, सवाष्ण, नवऱ्यापासून वेगळ्या झालेल्या अशा सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन मतांचे आदानप्रदान करावे असे त्यांचे मत होते.
दरम्यान, त्यांचे पार्थिव आज दुपारी 2 ते 5 या वेळेत नचिकेत, 33/ 25, प्रभात रोड, गल्ली क्रमांक चार येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विद्या बाळ यांचा अल्पपरिचय
पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, १९६४ ते १९८३ या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२साली प्रसिद्ध झाले.
स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था होती. १९८१ साली त्यांनी ’नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली.
याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे विद्या बाळ यांच्या संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केला. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी ‘सखी साऱ्याजणी’च्या आज गावोगावी शाखा आहेत.