ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार
By Admin | Published: February 3, 2016 06:33 PM2016-02-03T18:33:00+5:302016-02-03T18:33:13+5:30
स्व. पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन २०१५-१६ चा पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - स्व. पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन २०१५-१६ चा पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली.
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पंडीत भाई गायतोंडे, उस्ताद राजा मियाँ, पंडीत विजय कोपरकर,पंडीत केशव गिंडे, पंडीत सुरेश तळवलकर, पंडीत नाथराव नेरळकर, श्रीमती कमलताई भोंडे, श्रीमती कल्याणी देशमुख या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांची शिफारस केली होती. यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडीत जसराज आणि श्रीमती प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आला आहे.