नाशिकमध्ये सैन्यदलाची पेटी सापडल्यानं खळबळ
By admin | Published: September 25, 2016 10:16 PM2016-09-25T22:16:37+5:302016-09-25T22:56:22+5:30
सटाणा येथे एका मक्याच्या शेतात भारतीय लष्करातील लाखो रुपये किमतीची शस्त्रे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 - सटाणा येथे एका मक्याच्या शेतात भारतीय लष्करातील शस्त्रे असलेली पेटी सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही शस्त्रे बागलाण तालुक्यातील किकवारी येथे सापडली आहेत. सटाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाचे तीन अधिकारी सटाण्यात दाखल झाले आहेत. आज (26) भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सटाणा शहरात येणार आहेत. त्यानंतरच त्या पेटाऱ्यात कोणती शस्त्रे आहेत ते स्पष्ट होणार आहे. सटाण्याचे सहाय्यक पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील किकवारी शिवारात एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात भारतीय लष्कराचे आणि अशोक चक्र असलेली मोठे पेटारे असून, त्यावर अत्यंत गोपनीय शिक्का असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमसह गोपनीय तपासाला सुरुवात केली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कळवून त्यांचीही मदत घेण्यात आली. शिक्के पाहता प्रथम दर्शनी हा पेटारा बनावट असल्याचा दावा सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.