परमबीर सिंहांकडून पुन्हा खळबळजनक दावा; 'मातोश्री, सिल्वर ओक' वरील बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:59 PM2024-08-09T17:59:39+5:302024-08-09T18:00:52+5:30
परमबीर सिंह यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मुंबई - राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मविआतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याची शक्यता आहे. पात्रतेच्या आधारे केलेल्या बदल्यांना मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली होती असं सांगत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मविआ नेत्यांवर खळबळजनक दावे केले आहेत.
परमबीर सिंह म्हणाले की, माझ्यावर मविआ सरकारने त्यांच्या राजकीय विरोधकांवर बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी दबाव आणला गेला. अनिल गोटे हे माजी आमदार आहेत, त्यांची सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यासोबत अनिल देशमुखांच्या बंगल्यावर बैठक झाली होती. जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा याचा दबाव होता. मी त्यास नकार दिला, त्यानंतर मला सिल्वर ओकवर बोलवलं गेले. त्याठिकाणीही अनिल देशमुख आणि ही मंडळी उपस्थित होती. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. २०२० सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे घडलं होते. जयंत पाटील यांच्या ऑफिसलाही मला बोलावले होते. केवळ जयकुमार रावल, गिरीश महाजन नाही तर जयंत पाटील यांनी त्यांचे सांगली जिल्ह्यातील विरोधक आहेत, ज्यांचे कुठलेतरी मेडिकल कॉलेज आहे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मेडिकल कॉलेजवर धाड टाकावी असा दबाव जयंत पाटलांनी टाकला असं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्याशिवाय मला एकदा मातोश्रीवर बोलावले होते, तिथे अनिल देशमुख उपस्थित होते. मुंबई बँकेप्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मला सांगितले. मात्र या प्रकरणात तपास पूर्ण झाला होता. तिथेही मी गुन्हा दाखल करण्यास साफ नकार दिला. राजकीय विरोधकांविरोधात पोलिसांचा वापर करण्याचा प्रयत्न वारंवार मविआ नेत्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर होऊ देणार नाही यावर मी अडून राहिलो असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, माझ्याकडील पुरावे मी सुप्रीम कोर्टात सादर केलेत. अनिल देशमुखांनी वैयक्तिक शेरा मारलेली पत्रे माझ्याकडे आहेत. कुणाच्या सांगण्यावरून कोणाची पोस्टींग कुठे करायची आहे ते लिहिलेले आहे. ईडी, सीबीआयकडे ते दिलेत. अनिल देशमुखांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे आहे. जुलै २०२० मध्ये मी एसीपींची बदली त्यांच्या पात्रतेवर केली होती. चांगले अधिकारी नेमले होते. मात्र त्या बदलीला कुठलंही कारण न देता स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांचे, गृहमंत्र्यांचे आदेश आहेत असा मला मेसेज आला. त्यानंतर ३-४ दिवसांत त्याच अधिकाऱ्यांची बदली केली. त्यातील जे प्रामाणिक होते त्यांना बाहेर काढले गेले. यामागे काय प्रकार आहे हे सांगण्याची गरज नाही असं सांगत परमबीर सिंहांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मविआ नेत्यांवर निशाणा साधला.
"त्या बदल्या का रोखल्या, कारण दिलं नाही"
मुंबई पोलीस दलात होणाऱ्या बदल्यांचा अधिकार पोलीस आस्थापना बोर्डाला असते, त्याचे प्रमुख कमिश्नर ऑफ मुंबई पोलीस असतात. मेरिटच्या आधारे आम्ही बदल्या केल्या होत्या. मात्र त्यावर स्थगिती देण्याचे वरून आदेश आले. अतिरिक्त मुख्य सचिवांनी मला स्वत: मेसेज केला होता त्या बदल्यांना स्थगिती दिली, जे अधिकारी आहेत त्यांना जैसे थे स्थितीत ठेवायला सांगितले. या बदल्या का रोखल्या मला कधी सांगितले गेले नाही. या बदल्या रोखण्यामागे काय असतं हे सगळ्यांना ठाऊक, अधिकाऱ्यांकडून पैसे घेण्याचा हा प्रकार असतो. पैसे काढले की नाही माहिती नाही. मला बदल्यांना स्थगिती का दिली, नियमांचे उल्लंघन झालं का असं काही कारण दिले नाही असं परमबीर सिंह यांनी म्हटलं.