कैद्यांमधील संवेदनशील माणूस शोधणारी चळवळ
By admin | Published: December 7, 2014 12:25 AM2014-12-07T00:25:43+5:302014-12-07T00:25:43+5:30
एखादाच बेसावध क्षण कुणाचे तरी आयुष्य व्यापून उरतो. संतापाच्या भरात स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसल्यावर हातून गुन्हा घडतो आणि शिक्षा होते. त्याची सल आयुष्यभर कैद्यांच्याही मनात असते.
- त्यांनाही हवा आहे निकोप समाज...
गजानन चोपडे - नागपूर
एखादाच बेसावध क्षण कुणाचे तरी आयुष्य व्यापून उरतो. संतापाच्या भरात स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसल्यावर हातून गुन्हा घडतो आणि शिक्षा होते. त्याची सल आयुष्यभर कैद्यांच्याही मनात असते. पण कैद्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि हीनतेचाच. कैद्यांमध्येही माणूस असतो आणि त्यातही चांगुलपणा असतो, याचा समाजाला सोयीस्कर विसर पडतो. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच होत नाही. पण आता एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. त्यात एखाद्याने कैद्यांचे विचार जाणून घेतले तर....
राज्याच्या टोकावरील चंद्रपूरसारख्या शहरातून विदर्भ आणि आता मराठवाडामधील कैद्यांचे अनुभव आणि त्यांचे जीवनानुभव समाजाला एक नवी दृष्टी देऊ शकतात, हाच या प्रामाणिक प्रयत्नामागील हेतू. हा कैद्यांची केवळ भावनाच जाणून घेण्याचा नव्हे, तर माणसातल्या माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. खरं तर कैद्यांमधील संवेदनशील माणूस शोधणारी ही चळवळच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नावाचं औद्योगिक शहर. येथील श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार यांच्या पुढाकारातून कारागृहातील कैद्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि कैद्यांनी लेखणीतून व्यक्त केलेल्या भावना या उपक्रमाच्या यशाचं पहिलं पाऊल ठरलं.कारागृहातून सुटका झाल्यानंतर इतर बंदी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?, हा या स्पर्धेचा विषय. ११ आॅगस्ट २००७ रोजी चंद्रपूर कारागृहात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ३० बंद्यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ६४, यवतमाळ १२, भंडारा ४१, अमरावती ३३, वर्धा ६५, अकोला ५० तर बुलडाणा कारागृहातील २४ अशा एकूण ३१९ बंद्यांनी निबंधाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यातील काही बंदी तर उच्चशिक्षित आहेत. २००८ साली अमरावती कारागृहात घेण्यात झालेल्या स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविणारा ज्ञानेश्वर लिहितो, ‘कारागृहाचे ब्रिदवाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन. गुन्हा ही आजारी मनाची खूण आहे. कारावासाचा उद्देश आजारी मनाला दुरुस्त करून त्याला समाजात प्रामाणिकपणे आणि सन्मानाने जगण्याचे बळ देणे, हेच कार्य कारागृहाचे आहे.’ द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार मिळविणाऱ्या प्रल्हादचे शिक्षण एम.ए. (अर्थ), एम.कॉम.पर्यंत झाले आहे.
तो सांगतो, ‘कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सहनशीलता आणि स्वत:वर विश्वास ठेवा. परमेश्वरावर श्रध्दा असू द्या. एखाद्या कार्याला अंतिम चरणावर बघायचे असेल तर संयम ठेवणे, हाच एकमेव मानवीय पर्याय आहे.’
श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचा हा उपक्रम विदर्भापुरताच मर्यादित राहिला नसून मराठवाड्यातील (मध्य विभाग) औरंगाबाद, नाशिक, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, धुळे आणि जळगाव कारागृहातही मागील नोव्हेंबर महिन्यात ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात १५४ पुरुष आणि २ महिला बंद्यांनी सहभाग नोंदविला. आता उर्वरित महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये ही स्पर्धा राबविण्याचा सुंचूवार यांचा मानस आहे. एकंदरीत ही स्पर्धा नुसता उपक्रम राहिला नसून एक चळवळ झाली आहे.