‘छावणी’वर रोखलेल्या सेन्सॉरच्या संगिनी म्यान!

By Admin | Published: August 26, 2016 01:00 AM2016-08-26T01:00:32+5:302016-08-26T01:00:32+5:30

प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या.

The sensor of the sensor stops in the camp! | ‘छावणी’वर रोखलेल्या सेन्सॉरच्या संगिनी म्यान!

‘छावणी’वर रोखलेल्या सेन्सॉरच्या संगिनी म्यान!

googlenewsNext


पुणे : नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरुद्ध आहे, अशी भूमिका घेऊन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या. मात्र, कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा अडचणी उद्भवल्यास नाटक थांबविण्याचा अधिकार असल्याचे सांगून काही प्रमाणात ‘सेंन्सॉरशिप’ कायम ठेवली.
भारतातील कडव्या विचारसरणीच्या साम्यवादी संघटनांनी चालविलेल्या ‘नक्षलवादी’ चळवळीवर आधारित ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे ‘छावणी’ हे नाटक रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) अडवले, या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी बोर्डाकडे संहिता सादर केलेले गज्वी यांना बोर्डाने या संदर्भात साधे पत्र पाठविणे किंवा चर्चेसाठी बोलावण्याचेही सौजन्य न दाखविल्याने ते या अडवणुकीबद्दल अद्यापही अनभिज्ञच आहेत. मात्र, हे नाटक देशाच्या घटनेविरोधी असल्याने ते बाजूला ठेवले असल्याचे बोर्डाकडूनच वर्षभरानंतर समोर आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गज्वी यांनी ५ मे २०१५ रोजी प्रायोगिक नाटक म्हणून सेन्सॉर बोर्डाकडे त्यांच्या ‘छावणी’ या नाटकाची संहिता पाठविली. साधारपणे नियमानुसार ही संहिता बोर्डाच्या दोन किंवा तीन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते आणि त्यानंतर लेखकाला पत्र पाठवून ‘आमच्या अटी मान्य आहेत का? नसतील तर का?’ अशा स्वरूपाची विचारणा करण्यात येते आणि अटी मान्य झाल्यास चर्चेसाठी बोलावले जाते. मात्र, गज्वी यांच्यासंदर्भात असे काहीच घडले नाही. बोर्डाकडे या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता ‘लवकरच तुम्हाला मुंबईला बोलावू,’ अशी टोलवाटोलवीची उत्तरे त्यांना देण्यात आली.
तब्बल १५ महिन्यांनंतर गज्वी यांना पत्र पाठविण्याचे सौजन्य सेन्सॉर मंडळाने दाखविले. याविषयी प्रेमानंद गज्वी म्हणाले, ‘‘बोर्डाकडून दहा-बारा दिवसांपूर्वी पत्र मिळाले. त्यात ‘बैठकीला उपस्थित राहून तुमचे मत मांडा’ असे नमूद केले होते. मात्र, पत्रात कशाबद्दल मत मांडायचे आहे, असा स्पष्ट उल्लेख नव्हता. मग नलावडे यांना पत्र लिहून ‘काय मत मांडू?’ असे लिहिले त्यावर ‘जे काही नाटकात आहे ते सांगा.’ हे नाटक १९६०च्या चीन व पाकिस्तान कराराला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे. भारताला नक्षलवादाचा किती धोका आहे, याची मांडणी करणारे हे नाटक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाडच्या सत्याग्रहादरम्यान डाव्या चळवळीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दलितांचे शत्रू आहेत,’ असे विधान केले होते, तेच या नाटकाचे सूत्र आहे. मार्क्स माओ ऊर्फ एमएम या भूमिकेभोवती कथानक गुंफण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. त्यावर सदस्यांनी देशाविषयी चिंता करणारे हे नाटक आहे; मग बोर्डाने प्रमाणपत्र देऊ नये, असा मुद्दा उपस्थित केला होता.’’
>‘नाटकाची संहिता सभासदांकडून वेळेत वाचून आली नाही; त्यामुळे विलंब झाला. अशी चूक व्हायला नको होती, अशी दिलगिरी व्यक्त करून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी माघार घेतली. नाटकातला कुठलाही भाग न वगळ्ता एका प्रयोगासाठी नव्हे, तर कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. येत्या मंगळवारी हातात प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे हा वाद आता मिटला आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी एक निर्माताही मिळाला असून, कलाकार व दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात नाटकाचा प्रयोग करण्याचा मानस आहे.
- प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ नाटककार
>देशाविषयी चिंता व्यक्त करणारे हे नाटक असले, तरी नाटकाला कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाटकाबद्दल काही अडचणी उद्भवल्या तर ते थांबविण्याचा अधिकार आम्हाला आहे.
- अरुण नलावडे, अध्यक्ष, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड)

Web Title: The sensor of the sensor stops in the camp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.